नवी दिल्ली - कोव्हिशिल्ड लशीचे उत्पादन वाढविण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (एसआयआय) सरकारकडून मिळणाऱ्या निधीची वाट न पाहता बँकांकडून कर्ज घेतले आहे. केंद्र सरकारने सीरमला नुकतेच 3 हजार कोटी रुपयांची आगाऊ रक्कम देण्याचे जाहीर केले आहे.
सीरमने ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्राझेनकाच्या मदतीने कोव्हिशिल्ड ही कोरोना लस तयार केली आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच सीरमचे सीईओ आदार पुनावाला यांनी कोरोना लशीच्या उत्पादनासाठी 3 हजार कोटी रुपयांची गरज लागले असे म्हटले होते. देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत केंद्र सरकारने 1 मेपासून 18 वर्षांहून अधिक वय असलेल्या व्यक्तींचेही लसीकरण करण्याचे जाहीर केले आहे.
हेही वाचा-'कोव्हिशील्ड' हे नाव वापरण्यापासून 'सीरम'ला आता थांबवणे योग्य नाही - हायकोर्ट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फार्मा कंपनी, डॉक्टर व केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर सीरमला 3 हजार कोटी तर भारत बायोटेकला 1,500 कोटी रुपये देण्याचे जाहीर केले आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेली 3 हजार कोटी रुपयांची रक्कम येत्या आठवड्यात मिळेल, असा विश्वास सीरमने व्यक्त केला आहे. कोव्हिशिल्डची किंमत जगभरासाठी 750 ते 1,500 रुपये प्रति डोस आहे. त्या तुलनेत भारतात लशीची किंमत परवडणाऱ्या दरात असल्याचे सीरमने म्हटले आहे. सीरमकडून जुलैपर्यंत 20 कोटी डोस तर भारत बायोटेकडून 9 कोटी डोस सरकारला पुरविण्यात येणार आहेत. या प्रति डोसची किंमत 150 रुपये आहे.
हेही वाचा-केंद्राकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीचे सीरमकडून स्वागत
येत्या चार ते पाच महिन्यात खुल्या आणि किरकोळ विक्रीकरता (रिटेल) कोव्हिशिल्ड विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.