मुंबई - टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा व विद्यमान अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. त्यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी झालेल्या सुनावणी दरम्यान फेटाळून लावली.
टाटा सन्सच्या मंडळावर संचालक पदावर असलेले नुस्ली वाडिया हे 2016 मध्ये संचालक मंडळामधून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी मुंबईतील दिवाणी न्यायालयात रतन टाटा व एन. चंद्रशेखरन यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला होता. त्यावर 2018 साली रतन टाटा व एन. चंद्रशेखरन यांच्यासमवेत संचालक पदावरील इतर व्यक्तींच्या विरोधात दिवाणी न्यायालयाने समन्स बजाविले होते. या विरोधात टाटाकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाने दिवाणी न्यायालयाची कारवाई रद्द केली आहे.
नुस्ली वाडिया हे 2016 पर्यंत टाटा ग्रुपच्या काही कंपन्यांच्या संचालक मंडळात होते. नुस्ली वाडिया हे सायरस मिस्त्री यांचे समर्थक म्हणून ओळखले जात होते. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे व न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर वरिष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद केला. नस्ली वाडिया व टाटामधील हा कॉर्पोरेट वाद असल्याचे त्यांनी न्यायलायच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने अब्रूनुकसानीची याचिका रद्द केली आहे.