नवी दिल्ली - रिलायन्स इंडस्ट्रीजची मालकी असलेल्या हायड्रोकार्बन विभागाने कोरोनाच्या संकटकाळात केलेली वेतन कपात मागे घेतली आहे. या कर्मचाऱ्यांना रिलायन्सने बोनसही देऊ केला आहे.
रिलायन्सने हायड्रोकार्बनमधील कर्मचाऱ्यांना पुढील वर्षाचे ३० टक्के भत्ते देण्याची ऑफर केली आहे. कोरोना महामारीतही कर्मचारी काम करत असल्याने कंपनीने ही ऑफर दिल्याचे सूत्राने सांगितले.
कोरोना महामारीमुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात-
कोरोना महामारी आणि टाळेबंदीमुळे तेलशुद्धीकरणाच्या उत्पादनांची मागणी झाली होती. त्यामुळे रिलायन्सच्या हायड्रोकार्बन विभागाच्या व्यवसायावर परिणाम झाला होता. रिलायन्सने हायड्रोकार्बन विभागामधील कर्मचाऱ्यांच्या वेतनात एप्रिलमध्ये १० टक्के ते ५० टक्के कपात केली होती. तसेच रिलायन्स इंडस्ट्रीजची मालकी असलेल्या आणि देशातील सर्वात श्रीमंत असलेल्या मुकेश अंबानी यांनी सुमारे १५ कोटींचे भत्ते न घेण्याचा निर्णय घेतला होता. हायड्रोकार्बन विभागाकडून दरवर्षी कर्मचाऱ्यांना जूनच्या तिमाहीत बोनस आणि कामगिरीवर आधारित प्रोत्साहन रक्कम दिली जाते. मात्र, यंदा कोरोनाच्या संकटामुळे रिलायन्सने कर्मचाऱ्यांना बोनस आणि प्रोत्साहनपर रक्कम दिली नाही.
हायड्रोकार्बनमध्ये वार्षिक वेतन १५ लाख रुपयांहून अधिक असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात १० टक्के कपात झाली होती. मात्र, त्याहून कमी वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात झाली नव्हती. या कर्मचाऱ्यांच्या वेतनातील कपातीची रक्कमही त्यांच्या खात्यावर जमा केल्याचे सूत्राने सांगितले. मात्र, मुकेश अंबानी यांना भत्ते परत दिले गेले की नाहीत, याबाबत अधिक माहिती समोर येऊ शकली नाही.