नवी दिल्ली - अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने जिओमार्टचा देशात विस्तार केला आहे. जिओमार्टची सेवा देशातील २०० शहरांमध्ये लाँच केली आहे.
जिओमार्टची सेवा मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि कोलकाता या महानगरामध्ये सुरू आहे. त्याचबरोबर म्हैसूर, भटिंडा आणि डेहराडून अशा शहरांमध्येही जिओमार्टची ग्राहकांना सेवा मिळणार आहेत. जिओमार्टची २०० शहरात सेवा सुरू झाल्याचे ट्विट रिलायन्स रिटे ग्रोसरी बिझनेसचे सीईओ दामोदर मॉल यांनी केले.
हेही वाचा-महामारीने स्टार्टअप कंपन्यांचे मोडले कंबरडे; 'कारदेखो'कडून कर्मचारी कपात
गेल्या महिन्यात जिओमार्टने मुंबईजवळील तीन ठिकाणी प्रायोगिक तत्वावर सेवा सुरू केली होती. वापरकर्त्याला जिओमार्ट वेबसाईटवरूनही फळे, पालेभाज्या, दुग्धोत्पादने, स्नॅक्स, शीतपेये, वैयक्तिक आणि घरातील स्वच्छता उत्पादने अशी विविध उत्पादने खरेदी करता येतात. नुकतेच फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअॅपने जिओमार्टबरोबर भागीदारी केली आहे.
हेही वाचा-सर्वोच्च न्यायालयाने केंद्रासह आरबीआयला पाठविली नोटीस; 'हे' आहे कारण
अशी आहे रिलायन्सची व्हॉट्सअॅपबरोबर भागीदारी
फेसबुकने जिओमध्ये ९.९९ टक्के हिस्सा घेतला आहे. ही तंत्रज्ञान कंपनीमधील जगात सर्वात मोठी गुंतवणूक ठरली आहे. तर एफडीआयमधून (थेट विदेशी गुंतवणूक) ही देशातील सर्वात मोठी गुंतवणूक आहे. जिओ, रिलायन्स रिटेल आणि व्हॉट्सअॅपने व्यवसायिक भागीदार करार केला आहे. यामधून व्हॉट्सअॅपचा वापर करून जिओमार्ट ही रिलायन्स रिटेलचा व्यवसाय वाढणार आहे.
जिओमार्टची अशी घ्या सेवा-
- जिओमार्टचा हा ८८५०० ०८०० हा व्हॉट्सअॅप क्रमांक अॅड करा. त्यावर HI असा संदेश पाठवा
- त्यानंतर जिओ तुम्हाला ३० मिनिटे वैध असलेली चॅट विंडोची लिंक तुम्हाला पाठवेल.
- त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर पेजवर येणारी माहिती भरा. त्यामध्ये तुमचा पत्ता आणि मोबाईल क्रमांक असणार आहे.
- संपूर्ण माहिती भरल्यानंतर जिओ उपलब्ध असलेल्या वस्तुंची यादी दर्शविणार आहे. त्यानंतर जवळील किराणा स्टोअर निवडून वस्तू ग्राहकांना मागविता येणार आहेत.