नवी दिल्ली – रिलायन्स इंडस्ट्रीजने फेसबुकनंतर इतर चार कंपन्यांबरोबरील सौदे पूर्ण केले आहेत. या सौद्यातून कंपनीला 30 हजार 62 कोटी रुपयांहून अधिक रक्कम मिळाली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत जिओच्या चारही सौद्यांची माहिती दिली आहे. जे कॅटरटोन, द पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंड, सिल्व्हर लेक आणि सेंट्रल अटलांटिकला जिओचा एकूण 6.13 टक्के हिस्सा विकल्याची रिलायन्सने दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
रिलायन्सची मालकी असलेली जिओ ही देशातील सर्वात नवी दूरसंचार कंपनी आहे. या कंपनीचा 25.09 टक्के हिस्सा हा 1 लाख 17 हजार 588.45 कोटींना गुंतवणूकदारांना विकण्यात आला आहे.
रिलायन्सला अशी मिळाली रक्कम-
नुकतेच रिलायन्स इंडस्ट्रीजला फेसबुकची मालकी असलेल्या जाधू होल्डिंग्जकडून 43 हजार 574 कोटी रुपये मिळाले आहेत. या व्यवहारानंतर जाधू होल्डिंग्जकडे रिलायन्स जिओचा 9.99 टक्के हिस्सा येणार आहे. कॅटरटोनची मालकी असलेल्या इंटरस्टेल प्लॅटफॉर्म होल्डिंग्जने जिओला 1,894.50 कोटी रुपये दिले आहेत. तर पब्लिक इन्व्हेस्टमेंट कंपनीने 11 हजार 367 कोटी रुपये, सिल्व्हर लेकची मालकी असलेल्या एसएलपी रेडवूड होल्डिंग्ज कंपनी आणि एसएलपी रेडवून को इन्व्हेस्ट कंपनीने रिलायन्सला 10 हजार 202.55 कोटी रुपये दिले आहेत. जनरल अटलांटिक सिंगापूर कंपनीने जिओतील 1.34 हिस्स्यासाठी रिलायन्सला 6,598.38 कोटी रुपये दिले आहेत.