नवी दिल्ली - रात्री झोपण्यापूर्वी मुलांना गोष्टी ऐकवण्याची आपल्याकडे पद्धत होती. मात्र, ही सवय आता कालबाह्य होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर गुगल असिस्टंटने लहान मुलांसाठी गोष्टी वाचून दाखविणारे फीचर आणले आहे.
जर तुम्हाला आपल्या मुलांसाठी चांगल्या गोष्टी वाचून दाखविता येत नसेल, तर गुगल असिस्टंट तुमची मदत करणार आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त फोनवर जावून गुगल असिस्टंटचा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला पंचतत्रसारख्या चांगल्या गोष्टी गुगल असिस्टंटकडून ऐकायला मिळणार आहेत.
अशी मिळणार सुविधा -
अँड्राईड अथवा आयओएस फोन असल्यास गुगल असिस्टंटला फक्त तुम्ही म्हणायचे आहे, हाय गुगल, टेल मी स्टोरी! त्यानंतर तुम्हाला गुगलकडून स्टोरी ऐकायला मिळणार आहेत. दरवेळेस नव्या कथा ऐकायला मिळणार आहेत. त्यासाठी गुगलने टेल मी स्टोरी हे इंग्रजीमधील फीचर भारत, इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये गुरुवारपासून सुरू केले आहे. त्यासाठी तुमच्याकडे गुगल प्ले बुक्सचे नवे व्हर्जन असणे आवश्यक असल्याचे गुगल असिस्टंटचे उत्पादन व्यवस्थापक इरिक लियू यांनी ब्लॉगमध्ये म्हटले आहे.
हे फीचर पहिल्यांदा २०१८ मध्ये सुरू झाले होते. मात्र, ते फक्त गुगल होमपुरते मर्यादित होते. गुगल असिस्टंट हा व्हाईस सर्च असलेली सुविधा आहे. यातून तुम्हाला हवे असलेली माहिती व पर्याय आपल्या आवाजावरून शोधता येतात.