नवी दिल्ली - जेट एअरवेजचे माजी चेअरमन नरेश गोयल यांच्यासमोरील अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांनी करचुकवेगिरी करणाऱ्या योजनेमधून विदेशात पैसा नेला असल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केला आहे.
ईडीने नरेश गोयल यांच्या मालकीची मुंबईसह दिल्लीत निवासस्थाने, फर्म्स आणि भागिदारी एजन्सीच्या कार्यालयात शुक्रवारी झडती घेतली होती. गोयल यांनी फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याचा ईडीने दावा केला आहे. या झडतीदरम्यान विविध कागदपत्रे आणि डिजीटल पुरावे गोळा करण्यात आल्याचे ईडीने म्हटले आहे. पुढील तपास आणि विश्लेषण सुरू असल्याचेही ईडीने म्हटले आहे. गोयल यांनी देश व विदेशातील कंपन्यांमधून कर चुकविल्याचे प्राथमिक तपासातून समोर आल्याचे ईडीने म्हटले आहे. गोयल हे विदेशातील १९ संस्थांचे नियंत्रण करत असल्याचेही ईडीने म्हटले आहे.
गोयल यांनी विदेशातील बँकेत ठेवलेल्या मोठ्या मुदत ठेवीचा फायदा मिळत असल्याचे ईडीला आढळून आले आहे. यामधून विदेशी विनिमिय व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याचे प्राथमिक चौकशीमधून दिसून आले आहे. ईडीने गोयल यांच्या मुंबईमधील निवासस्थानासह इतर ठिकाणी शुक्रवारी झडती घेतली होती.
अशी आहे जेट एअरवेजची स्थिती-
जेट एअरवेज १७ एप्रिलपासून बंद आहे. कंपनी व्यवहार मंत्रालयाला जेट एअरवेजमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता, निधी इतरत्र वळविणे असे गैरप्रकार आढळून आले आहेत. गोयल हे मार्चमध्ये चेअरमनपदावरून पायउतार झाले आहेत. सध्या जेट एअरवेज ही दिवाळखोरी आणि नादारी कायद्याच्या प्रक्रियेमधून जात आहे.