मुंबई - रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे सलग आठव्या वर्षी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहे. त्यांच्याकडे एकूण ३ लाख ८० हजार ७०० कोटींची संपत्ती असल्याचे आयआयएफएल वेल्थ फोरमने म्हटले आहे. विशेष म्हणजे देशातील सर्वात श्रीमंत २५ व्यक्तींची संपत्ती भारताच्या जीडीपीच्या १० टक्के एवढी असल्याचीही माहिती समोर आली आहे.
दुसऱ्या क्रमांकावर लंडनस्थित एसपी हिंदुजा आणि कुटुंबाची संपत्ती एकूण १ लाख ८६ हजार ५०० कोटींची आहे. तिसऱ्या क्रमांकावर विप्रोचे संस्थापक अजीम प्रेमजी आहेत. त्यांच्याकडे १ लाख १७ हजार १०० कोटींची संपत्ती आहे. आयआयएफएल वेल्थ हरुणने भारतीय श्रीमंताची यादी जाहीर केली आहे. यामध्ये १ हजार कोटींहून मालमत्ता असलेल्या भारतीयांच्या संख्येत वाढ झाली आहे. ही संख्या २०१८ मध्ये ८३१ तर २०१९ मध्ये ९५३ झाली आहे. तर डॉलरमधील संपत्तीप्रमाणे असलेल्या अब्जाधीशांची संख्या ही १४१ वरून १३८ झाली आहे.
आर्सेलर मित्तलचे सीईओ आणि चेअरमन एल.एन.मित्तल हे चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्याकडे १ लाख ७ हजार ३०० कोटींची मालमत्ता आहे. गौतम अदानी यांच्याकडे ९४ हजार ५०० कोटींची मालमत्ता आहे.
उद्योगपती | यादीमधील क्रमांक | एकूण संपत्ती |
उदय कोटक | सहावा | ९४,१०० कोटी |
सायरस एस पुनावाला | सातवा | ८८,८०० कोटी |
सायरस पलोनजी मिस्री | आठवा | ७६,८०० कोटी |
शपूर पलूनजी | नववा | ७६,८०० कोटी |
दिलीप संघवी | दहावा | ७१,५०० कोटी |
येत्या काही वर्षात श्रीमंताची संख्या तिप्पट होईल-
एकूण संपत्तीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत २ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर सरासरी संपत्तीमध्ये ११ टक्क्यांची घट झाली आहे. जगभरात संपत्ती निर्माण करणारे हे अर्थव्यवस्थेला गती देतात. त्यामुळे संपत्ती निर्माण करणारे हे आर्थिक विकासाला आकार देण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पडतात. भारताने ५ लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात भारतीय श्रीमंताची संख्या तिप्पट होईल, असा विश्वास हरुण इंडियाचे एमडी अनस रहमान जुनैद यांनी व्यक्त केला.
भारतीय श्रीमंताच्या यादीत मुंबईच्या उद्योगपतींचा अधिक भरणा-
श्रीमंताच्या यादीमधील २६ टक्के म्हणजे २४६ उद्योगपती हे मुंबईमधील आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर दिल्लीतील (१७५) व चौथ्या क्रमांकावर बंगळुरूमधील (७७) आहेत. भारतीय श्रीमंताच्या यादीत ८२ अनिवासी भारतीय आहेत. यामध्ये सर्वात अधिक अनिवासी हे संयुक्त अरब अमिराती व त्यानंतर इंग्लंडमधील आहेत.
ओयो रुमचा २५ वर्षीय संस्थापक रितेश अग्रवाल हा सर्वात तरुण श्रीमंत ठरला आहे. जगभरातील भारतीय श्रीमंत महिलांच्या यादीत सरासरी ५६ वर्षाच्या १५२ महिला आहेत. एचसीएल टेक्नॉलॉजीसच्या रोशनी नदार (३७) या सर्वात श्रीमंत महिला आहे. तर भारतामधील बायोकॉनच्या संस्थापक किरण मुझुमदार-शॉ सर्वात श्रीमंत महिल्या ठरल्या आहेत.