नवी दिल्ली- पारले-जी बिस्कीट कंपनीने टाळेबंदीदरम्यान विक्रीच्या व्यवसायात नवा विक्रम केला आहे. अत्यंत स्पर्धा असलेल्या बिस्कीट श्रेणीत कंपनीने 5 टक्के हिस्सा मिळविला आहे. महामारीच्या काळात लोकांनी जास्तीत जास्त अन्नसाठा करण्याकडे प्राधान्य दिले आहे. त्याचा पारले कंपनीला फायदा झाला आहे.
पारले-जी बिस्किटाची किंमत दोन रुपयापासून पुढे आहे. महामारीच्या काळात अनेक सेवाभावी संस्थांनी पार्ले जी बिस्किटांची गोरगरिबांना मदत केली आहे. पारलेजी ग्लुकोजचा चांगला स्त्रोत असल्याचे पारले प्रॉडक्टचे वरिष्ठ व्यवस्थापक मयांक शहा यांनी सांगितले. पारलेच्या विक्रीत वाढ झाल्यामुळे कंपनीचा बाजारपेठेतील हिस्सा 4.5 टक्क्यांवरून पाच टक्के झाला आहे. गेल्या तीस-चाळीस वर्षात पारलेने सर्वात मोठा विक्री व्यवसाय महमारीच्या संकटात अनुभवला आहे.
पारले-जी हे केवळ बिस्किट नसून सहज उपलब्ध होणारे अन्न असल्याचे मयांक शहा यांनी सांगितले. सुनामी व भूकंप अशा काळातही पारलेची मोठी विक्री झाल्याची त्यांनी माहिती दिली. कंपनीने तीन कोटी पारले बिस्कीटांचे मोफत वितरण करण्याचे जाहीर केले होते. दरम्यान, गतवर्षी पारले कंपनीला मंदावलेल्या अर्थव्यवस्थेचा फटका बसला होता.