मुंबई – देशाच्या आर्थिक राजधानीतील आघाडीचे हिरे व्यापारी असलेले अरुण कुमार रमणीकलाल मेहता यांचे आज निधन झाले. मेहता यांनी खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते ८० वर्षांचे होते. त्यांनी सहा दशकांपूर्वी बी. अरुणकुमार अँड कंपनीची स्थापना केली होती.
काही दिवसांपूर्वी अरुणकुमार घरातील बाथरुममध्ये घसरून पडले होते. त्यांना सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या पश्चात मुलगा रसेल मेहता (रोझी ब्लू इंडियाचे व्यवस्थापक) आहे. तर एक मुलगी तसेच दिलीप आणि हर्षद मेहता हे दोन भाऊ आहेत. मेहता यांची नात श्लोका हिचा आकाश मुकेश अंबानी यांच्याबरोबर मार्च २०१९ मध्ये विवाह झाला आहे.
कठीण परिश्रमातून उद्योगाची उभारणी
मेहता यांचा गुजरातमधील पाटन या छोट्याशा गावात जन्म झाला होता. त्यांनी मुंबईत हिरे कटिंग व पॉलिशिंगचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर त्या उद्योगाला १९६०मध्ये अरुणकुमार अँड कंपनी असे नाव दिले. याच कंपनीचे रोझी ब्लू ग्रुप असे नाव बदलण्यात आले.
अथक परिश्रमाने त्यांनी सुरू केलेली ही छोटी कंपनी ही जगात सर्वधिक हिरे निर्मिती करणाऱ्या कंपन्यांपैकी एक कंपनी म्हणून ओळखली जाऊ लागली. या कंपनीच्या भारतासह बेल्जियम, इस्रायल, रशिया, चीन, थायलंड व श्रीलंकेत हिरे उत्पादन केंद्र आहेत. अरुणकुमार मेहता हे हिरे निर्यात संघटनेसह विविध संघटनेच्या कामकाजात सक्रिय होते. त्यांच्या मृत्यूमुळे उद्या मुंबईमधील हिरे उद्योगाचे कामकाज बंद राहणार असल्याचे सूत्राने सांगितले.