मुंबई - देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) नफ्यात दुसऱ्या तिमाहीत १.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबईस्थित असलेल्या टीसीएस कंपनीने दुसऱ्या तिमाहीत निव्वळ ८ हजार ४२ कोटी रुपयांचा नफा कमविला आहे.
टीसीएसने मुंबई शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार कंपनीने गतवर्षी दुसऱ्या तिमाहीत ७ हजार ९०१ कोटींचा नफा मिळविला होता. गतवर्षीच्या तुलनेत टीसीएसच्या जुलै ते सप्टेंबरच्या कालावधीमधील महसुलात ५.८ टक्क्यांची वाढ झाली आहे.
टीसीएसच्या संचालक मंडळाने समभागधारकांसाठी दुसरा अंतरिम लाभांश म्हणून ५ रुपये तर विशेष लाभांश म्हणून ४० रुपये जाहीर केला आहे.
वित्तीय सेवात वाढती अस्थिरता असतानाही स्थिरपणे तिमाहीत प्रगती केल्याचे टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा व्यवस्थापकीय संचालक राजेश गोपीनाथन यांनी सांगितले. आमच्याकडून देण्यात येणाऱ्या मध्यम आणि दीर्घकाळासाठीच्या सेवांना यापुढेही चांगली मागणी राहील, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. कंपनीने दुसऱ्या तिमाहीत मिळविलेला नफा हा गेल्या सहा तिमाहीत सर्वात अधिक असल्याचेही त्यांनी सांगितले.