नवी दिल्ली - कर्नाटक सरकारने ओला कॅबवरील बंदी हटविली आहे. आजपासून ओला कॅब सुरू करता येतील, असे सामाजिक कल्याण मंत्री प्रियांक खर्गे यांनी म्हटले आहे. विना परवाना ओला कंपनीकडून बाईक टॅक्सी चालविण्यात आल्याने दोन दिवसांपूर्वी ओला कॅबवर बंदी घालण्यात आली होती.
नव्या तंत्रज्ञानासाठी धोरण तयार करण्याची गरज कर्नाटकचे समाजकल्याण मंत्री प्रियांक खर्गे यांनी ट्विट करून व्यक्त केली आहे.समस्येवर लवकर तोडगा काढल्याबद्दल ओला कॅब्समधील गुंतवणूकदार असलेल्या मॅट्रिक्स पार्टनर्स इंडियाने सरकारचे कौतुक केले आहे. तरुण असलेले मंत्री हे नवतंत्रज्ञानाला प्रोत्साहन देत असल्याचे मॅट्रीक्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश बजाज यांनी ट्विट केले.
सहा महिन्यांसाठी परवाना केला होता रद्द-
कर्नाटकच्या वाहतूक विभागाने ओलाचा वाहतूक परवाना सहा महिन्यांसाठी रद्द केला होता. बाईक टॅक्सी परवान्याशिवाय चालवित असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे कर्नाटक सरकारने म्हटले होते. याबाबतचा अहवाल वाहतूक उपायुक्त आणि वरिष्ठ प्रादेशिक वाहतूक अधिकारी बंगळुरू (दक्षिण) यांनी राज्य सरकारला सादर केला होता. यावर प्रतिक्रिया देताना ओलाने कायद्याला बांधील असल्याचे म्हटले होते. जीवनमान उंचावणे आणि नवे तंत्रज्ञान उद्योगात येण्यासाठी काम करत असल्याचे ओलाने प्रतिक्रिया दिली होती.
यामुळे करण्यात आली होती कारवाई-
कर्नाटकमध्ये ऑन डिमांड वाहतूक तंत्रज्ञान असलेला कायदा २०१६ मध्ये लागू झाला आहे. या कायद्यानुसार केवळ अॅपच्या सहाय्याने टॅक्सी सेवा देण्याचा परवाना ओला कंपनीला देण्यात आला होता. यामध्ये बाईक टॅक्सी सेवेचा समावेश नाही.