नवी दिल्ली - रिलायन्स जिओने भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडीयावर फसवणुकीचा आरोप केला आहे. या कंपन्यांकडून लँडलाईनच्या क्रमांकाचा मोबाईलसाठी वापर होत असल्याचे रिलायन्स जिओने म्हटले आहे. अशा प्रकारे नियमांचा भंग करणाऱ्या कंपन्यांना कठोर दंड आकारावा, अशी विनंती जिओने ट्रायला केली आहे.
दूरसंचार कंपन्यांनी काही ग्राहकांना लँडलाईनचे क्रमांक हे मोबाईल क्रमांकाला वापरायला दिले आहेत. असे मोबाईल क्रमांक हेल्पलाईनसाठी वापरण्यात येत असल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. असे नियमभंगाचे गंभीर प्रकार घडताना ट्रायने तत्काळ दखल घ्यावी, अशी जिओने मागणी केली आहे. जिओने ट्रायचे चेअरमन आर. एस. शर्मा यांना पत्र लिहून फसवणुकीची तक्रार केली आहे. हजारो मोबाईल क्रमांकांचा बेकायदेशीपणे वापर सुरू असल्याचा संशय जिओने व्यक्त केला. काही क्रमांकाची यादीही जिओने ट्रायला दिली आहे.
जिओच्या आरोपाला भारती एअरटेलने प्रत्युत्तर दिले आहे. जिओकडून दूरसंचार नियामक प्राधिकरण संस्थेची (ट्राय) इंटरकनेक्ट युझेज प्रकरणात दिशाभूल होत असल्याचे भारती एअरटेलने म्हटले आहे. एंटरप्रायजेसला दिलेले मोबाईल क्रमांक हे दूरसंचार विभागाच्या मंजुरीने दिलेले असतात. ग्राहक हे मोबाईल क्रमांकावर कॉल करत असल्याने कोणतीही फसवणूक होत नसल्याचे भारती एअरटेलच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
हेही वाचा- रिलायन्सचे 'गुजरात प्रेम', जिओसह पाच उपकंपन्यांची मुंबई सोडून अहमदाबादमध्ये केली नोंदणी
इंटरकनेक्ट युजेसच्या शुल्कावरून जिओचा व्होडाफोन आयडियासह भारती एअरटेल या कंपन्याबरोबर वाद सुरू आहे. याबाबत व्होडाफोन आयडियाने प्रतिक्रिया दिली नाही.
काय आहे इंटरकनेक्ट युजेस चार्ज
एका दूरसंचार ऑपरेटच्या क्रमांकावरून दुसऱ्या कंपनीच्या दूरसंचार ऑपरेटच्या मोबाईल क्रमांकावर कॉल केल्यास शुल्क आकारण्यात येते. हे इंटरकनेक्ट युजेस चार्ज (आययूसी) म्हणून आकारण्यात येते. ट्रायने २०१७ मध्ये १७ पैशांवरून इंटरकनेक्ट युसेज चार्ज हे ६ पैसे केले आहे. हे शुल्क जानेवारी २०२० मध्ये बंद करण्यात येणार असल्याचे ट्रायने जाहीर केले आहे. ही मुदत वाढविण्याबाबत ट्राय सध्या विचार करत आहे.
हेही वाचा- जिओच्या ग्राहकांना पहिल्यांदाच कॉलिंगकरिता मोजावे लागणार पैसे; 'हा' आहे नवा दर