सॅनफ्रान्सिस्को – अॅमेझॉनचे संस्थापक आणि सीईओ जेफ बेझोस यांनी कंपनीचे 3.1 अब्ज डॉलरचे शेअर विकले आहेत. ही माहिती जेफ यांनी यूएस सिक्युरिटीज आणि एक्स्चेंज कमिशनला दिलेल्या कागदपत्रांमधून समोर आली आहे.
जेफ बेझोस यांना कर वगळता शेअर विक्रीतून 2.4 अब्ज डॉलरची रक्कम मिळणार असल्याचे अमेरिकन माध्यमाने म्हटले आहे. जेफ यांनी कोणत्या कारणाने शेअरची विक्री केली, याचे कारण अद्याप समोर आले नाही. जेफ यांनी दरवर्षी 1 अब्ज डॉलरच्या अॅमेझॉनच्या शेअरची विक्री करणार असल्याचे जाहीर केले होते. यामधून मिळणाऱ्या निधीचा वापर ब्ल्यू ओरिजन या अंतराळ कंपनीच्या कामासाठी वापरण्यात येणार आहे.
जेफ यांनी 2020 मध्ये सुमारे 7.2 अब्ज डॉलरच्या शेअर विक्री केली आहे. तर 2019 मध्ये 2.8 अब्ज डॉलरच्या शेअरची विक्री केली होती. कंपनीमध्ये जेफ बेझोस यांचे सर्वाधिक 54 दशलक्ष शेअर आहेत.
अॅमेझॉन कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत चांगली आर्थिक कामगिरी केली आहे. कंपनीने 40 टक्क्यांची अधिक विक्री करून 88.8 अब्ज डॉलरचे उत्पन्न मिळविले आहे. तर मागील आर्थिक वर्षात दुसऱ्या तिमाहीत 63.5 अब्ज डॉलरचे कंपनीने उत्पन्न मिळविले होते.