नवी दिल्ली- इन्फोसिसचे सहसंस्थापक एन.आर. नारायण मूर्ती यांना रॉयल हॉलोवे विद्यापीठाकडून मानद पदवी (डॉक्टर ऑफ सायन्स) बहाल करण्यात आली. संगणक शास्त्रामधील (कॉम्प्युटर सायन्स) योगदानाबद्दल ही पदवी त्यांना देण्यात आली आहे. हा कार्यक्रम इंग्लंडमधील इगहॅमम, सर्रे येथील विद्यापीठाच्या आवारात संपन्न झाला.
कार्यक्रमात संगणक शास्त्र शाखेचे पदव्युत्तर आणि स्नातक (अंडरग्रॅज्युएट) विद्यार्थी सहभागी झाले. यावेळी बोलताना नारायण मूर्ती म्हणाले, हा सन्मान मिळणे माझ्यासाठी मोठ्या गौरवाची बाब आहे. रॉयल हॉलोवोने माझी अशा रीतीने दखल घेतली, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. नवी पिढी पदवीधर होताना त्यांच्यामध्ये सहभागी होणे हे सन्मानाचे आहे. चांगले करिअर आणि अधिक कार्यक्षमतेने काम करण्यासाठी ते पावले उचलतील, अशी अपेक्षा आहे. पदवीधरांकडे असलेले ज्ञान आणि कौशल्य हे जगाला आणखी सकारात्मक करेल, असा त्यांनी यावेळी विश्वास व्यक्त केला.
मूर्ती यांनी इन्फोसिसची स्थापना केली. सध्या इन्फोसिस ही जगभरातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक आहे. इन्फोसिसमध्ये २.२ लाख कर्मचारी कार्यरत आहेत. तर दर तिमाही दरम्यान इन्फोसिस ३ अब्ज डॉलरचे उत्पन्न मिळविते. यापूर्वीही मूर्ती यांच्या कार्याची जगभरात दखल घेण्यात आली आहे. त्यांची २००७ मध्ये कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पाअर (सीबीई) म्हणून नियुक्ती करण्यात आली.