नवी दिल्ली - वाहन उद्योगात मंदी असताना हिरो मोटोकॉर्पने कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) योजना जाहीर केली आहे. उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे कंपनीने म्हटले आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे वय ४० हून अधिक आहे, त्यांच्यासाठी ही योजना असल्याचे हिरो मोटोकॉर्पेने म्हटले आहे.
स्वचेच्छानिवृत्तीसाठी कर्मचाऱ्यांकडून २८ सप्टेंबरपर्यंत हिरो मोटोकॉर्प अर्ज स्विकारणार आहे. वय ४० हून अधिक असलेले व सलग ५ वर्षे सेवा केलेले कर्मचारी स्वेच्छानिवृत्तीसाठी पात्र असणार आहेत.
कर्मचाऱ्याने बजाविलेला सेवाकाळ व उर्वरित ५८ वर्षापर्यंतची सेवा लक्षात घेवून कर्मचाऱ्याला एकाचवेळी (लम्पसम्प) पॅकेज देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त कर्मचाऱ्याला भेट, हिरो उत्पादनाच्या खरेदीवर सवलत, वैद्यकीय लाभ, कंपनीने दिलेल्या कार व लॅपटॉपवर सवलत, मुलांना करिअरमध्ये संधी दिल्या जाणार आहेत.
कर्मचाऱ्यांची मागणी लक्षात घेवून हा निर्णय घेण्यात आल्याचे हिरो मोटोकॉर्पच्या प्रवक्त्याने सांगितले. स्वेच्छानिवृत्तीची योजना कंपनीबरोबर कर्मचाऱ्यांना फायदेशीर (विन अँड विन) असल्याचेही प्रवक्त्याने म्हटले आहे.
वाहन उद्योगात मंदीचा प्रभाव-
गेल्या २० वर्षात प्रथमच वाहन कंपन्यांच्या विक्रीत घट झाली आहे. महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, हुंदाईसह बहुतेक सर्व वाहन कंपन्यांनी उत्पादन प्रकल्प काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.