नवी दिल्ली - ई-कॉमर्स कंपन्यांना २० एप्रिलनंतर बिगर जीवनावश्यक वस्तुंची विक्री करण्याची दिलेली परवानगी केंद्रीय गृहमंत्रालयाने रद्द केली आहे. टाळेबंदीतील पूर्वीच नियम ई-कॉमर्स कंपन्यांना २० एप्रिलनंतरही लागू असतील, असे सुधारित आदेश मंत्रालयाने काढले आहेत.
केंद्र सरकारने चारच दिवसांपूर्वी ई-कॉमर्स कंपन्यांना बिगर जीवनावश्यक वस्तुंची परवानगी देण्याचे आदेश काढले होते. यामध्ये मोबाईल, फ्रीज व लॅपटॉप आदींचा समावेश होता.
संबंधित बातमी वाचा-टाळेबंदीतही लॅपटॉपसह इतर वस्तुंची खरेदी शक्य; फ्लिपकार्ट घेतेय ऑर्डर
ई-कॉमर्स कंपन्यांना बिगर जीवनावश्यक वस्तुंची विक्री करता येणार नाही, असे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाचे सचिव अजय भल्ला यांनी आज काढले आहेत. असे असले तरी जीवनावश्यक वस्तू असलेल्या वाहनांनी परवानगी घेतल्यानंतर त्यांना वाहतूक करता येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.
हेही वाचा-कोरोनाच्या संकटात संधी शोधणाऱ्या चीनला बसणार पायबंद; सरकारने काढले हे आदेश
दरम्यान, अखिल भारतीय व्यापारी संघटनेने (सीएआयटी) ई-कॉमर्स कंपन्यांना बिगर जीवनावश्यक वस्तुंची विक्री करण्याची परवानगी देण्यावर आक्षेप घेतला होता. टाळेबंदीमुळे देशभरातील बिगर जीवनावश्यक वस्तुंची विक्री करणारे सर्व दुकाने बंद आहेत. फ्लिपकार्टने बिगर जीवनावश्यक वस्तुंच्या ऑर्डर घेणे कालपासून सुरू केले होते. मात्र, आज सरकारचे आदेश येताच ऑनलाईन ऑर्डर केवळ जीवनावश्यक वस्तुंच्याच घेण्यात येत आहेत.