नवी दिल्ली - जिओनंतर रिलायन्स रिटेलची गुंतवणुकीत घौडदौड सुरू झाली आहे. जनरल अटलांटिक कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिटेल उद्योगाचा ०.८४ टक्के हिस्सा खरेदी करणार आहे. त्यासाठी जनरल अटलांटिक रिलायन्समध्ये ३ हजार ६७५ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
जनरल अटलांटिक ही रिलायन्स रिटेल व्हेंचर्समध्ये (आआरव्हीएल) गुंतवणूक करणार आहे. रिलायन्स रिटेलमध्ये गुंतवणूक करणारी जनरल अटलांटिक ही तिसरी अमेरिकन कंपनी ठरली आहे. यापूर्वी सिल्वर लेकने रिलायन्स रिटेलमध्ये ७,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले आहे. केकेआर कंपनीने गेल्याच महिन्यात रिलायन्स रिटेलमध्ये ५ हजार ५५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यापूर्वी जनरल अटलांटिक कंपनीने रिलायन्स जिओमध्ये ६ हजार ५९८.३८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.
रिलायन्स रिटेल लिमिटेड (आरआरव्हीएल) ही देशातील सर्वात मोठी वेगाने विकसित होणारी आणि नफ्यातील रिटेल कंपनी आहे. ही कंपनी सुपरमार्केट, इलेक्ट्रॉनिक्स चेन स्टोअर, ऑनलाइन किराणा अशा उद्योगात आहे. रिलायन्स रिटेलचे देशातील लहान शहरांमध्ये १२ हजार स्टोअर आहेत. रिलायन्स रिटेलला मागील आर्थिक वर्षात १.६३ लाख कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.
देशातील रिटेल उद्योगात अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टचे वर्चस्व आहे. या कंपन्यांना आव्हान देण्यासाठी रिलायन्सकडून आक्रमकपणे बाजारपेठेत विस्तार करण्यात येणार आहे. जनरल अटलांटिकने विविध स्टार्टअप आणि कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. यामध्ये अलिबाबा, बाईटडान्स व फेसबुक अशा कंपन्यांचा समावेश आहे.