नवी दिल्ली - दुचाकीसाठी सुट्टे भाग तयार करणाऱ्या पुण्यातील फ्लॅश ईलेक्ट्रॉनिक इंडिया कंपनीने रॉयल एनफील्डविरोधात अमेरिकेत खटला दाखल केला आहे. रॉयल एनफील्डने उत्पादन आणि ईलेक्ट्रॉनिक पार्टमध्ये पेटंट कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप फ्लॅश इलेक्ट्रॉनिक इंडियाने दाव्यातून केला आहे.
दुचाकींना लागणाऱ्या पार्टचे उत्पादन आणि पुरवठादार करणारी फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स ही आघाडीची कंपनी आहे. या कंपनीकडे रेग्युलेटर रेक्टिफायर डिव्हासचे पेटंट आहे. या डिव्हाईसमुळे व्हॉल्टेजचे नियमन करणे सोपे जाते. त्यासाठी कंपनीला २० फेब्रुवारी २०१८ ला अमेरिकेत पेटंट मिळाले होते.
आम्हाला पुरविण्यात येणारा दुचाकीचा तो सुट्टा भाग हा बाह्य पुरवठादाराकडून देण्यात आल्याचे रॉयल एनफील्डने म्हटले आहे. दुचाकीच्या सुटट्या भागाची बौद्धिक संपदाच्या अधिकारानुसार निर्मिती केली आहे. संबंधित पुरवठादाराने दावा फेटाळून लावल्याचेही रॉयल एनफील्डने म्हटले आहे.
फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव वासदेव म्हणाले, आम्ही ऑटोमोबाईल क्षेत्रातील विश्वासू पुरवठादार आणि उत्पादक आहोत. रॉयस एनफील्डबरोबर असा सौदा करणे (deal) हे अनेपेक्षित आणि दुर्दैवी आहे. पुढे ते म्हणाले, यापूर्वी रॉयल एनफील्ड कंपनीच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नवी दिल्लीत १२ ऑक्टोबर २०१८ ला भेट घेतली होती. मात्र वाद सोडविण्यासाठी कोणताही तोडगा काढण्यात आला नाही. पेटंटचे उल्लंघन करणाऱ्या रॉयल एनफील्डविरोधात जगभरात योग्य कारवाईसाठी पावले उचलणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी सुट्टे भाग तयार करणाऱ्या कंपन्यांनी सावधगिरी बाळगावी, असे त्यांनी आवाहन केले. दरम्यान पुणे हे देशातील ऑटोमोबाईल हब म्हणून ओळखले जाते.