नवी दिल्ली - फेसबुकने जागतिक मानसिक आरोग्याच्या निमित्ताने इमोशनल हेल्थ हे टूल भारतात उपलब्ध करून दिले आहे. यामध्ये कोरोनाच्या महामारीत आरोग्याची समस्येवर मार्गदर्शन मिळणार आहे.
फेसबुकने मानसिक आरोग्यासाठी 'ओके टू टॉक' ही मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी कंपनीने आयकॉल मानसिक सामाजिक हेल्पलाईन (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस) आणि लिव्ह लव्ह लाफ फाउंडेशनबरोबर करार केला आहे. या संस्थांकडून फेसबुकच्या वापरकर्त्यांना मानसिक आरोग्यासाठी हेल्पलाईन उपलब्ध करण्यात येणार आहे.
फेसबुक इंडियाचे उपाध्यक्ष अजित मोहन म्हणाले, की जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त इमोशनल हेल्थ आणि कोविड -१९ माहिती केंद्र हे फेसबुक अॅपवर लाँच केले आहे. त्याशिवाय नवीन आठ मार्गदर्शक सुविधा इन्स्टाग्रामवर सुरू केल्या आहेत. इन्स्टाग्रामवर दर रिअल टॉक ही सिरीज शनिवारी सुरू केली आहे. आशिया-पॅसफिक प्रदेशात ३५ हजार ग्रुप हे मानसिक आरोग्याशी संबंधित आहेत. तर त्यामध्ये ६० लाख लोक सक्रिय असल्याचे मोहन यांनी सांगितले. चला, आपण आपल्या भावनांबाबत जागृत होऊ. त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो, हे माहित करून घेऊ. कोणताही संकोच अथवा किंतू न बाळगता मदतीसाठी संपर्क करू, असे मोहन यांनी आवाहन केले.