नवी दिल्ली - आपण वापरत असलेल्या बहुंताश एटीएम अथवा डेबिट कार्डसाठी मास्टरकार्ड ही कंपनी तंत्रज्ञानाची सेवा पुरविते. या कंपनीने भारतामधील ग्राहकांचा डाटा देशातच ठेवण्याची तयारी सुरू केली आहे. वर्षाखेर संपूर्ण भारतीय ग्राहकांचा डाटा अमेरिकेतील सर्व्हरवरून देशातील सर्व्हरवर संग्रहित करण्यात येईल , असे मास्टरकार्ड कंपनीने म्हटले आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने आर्थिक देवाण-घेवाणीसाठी (पेमेंट) तंत्रज्ञान पुरविणाऱ्या कंपन्यांना देशातच डाटा ठेवण्याचे निर्देश दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी करणे बंधनकारक असल्याने मास्टरकार्डने पावले टाकायला सुरुवात केली आहे . त्यानुसार मास्टरकार्डने गतवर्षी ऑक्टोबरपासून अमेरिकेतील सर्व्हरबरोबरच देशातील सर्व्हरवर ग्राहकांचा डाटा संग्रहित करायला सुरुवात केली आहे. याबाबत बोलताना मास्टरकार्डचे सहअध्यक्ष (आशिया पॅसिफिक विभाग ) अॅरी सॅरकर म्हणाले की, डाटाची कॉपी देशात ठेवणे हा पहिला टप्पा होता. मात्र हा डाटा केवळ भारतामध्येच ठेवणे आव्हानात्मक असणा आहे. कारण देशातील काही सर्व्हरवर डाटा ठेवण्यापुरते ते मर्यादित काम नाही. पुढे ते म्हणाले, आरबीआयच्या गरजेनुसार सर्व पूर्तता करण्यात येणार आहे. त्याबाबत आरबीआयबरोबर चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
मास्टरकार्डचे पहिल्यांदाच अमेरिकेबाहेर असणार सर्व्हर-
येत्या पाच वर्षात १०० कोटी डॉलरची देशात गुंतवणूक करणार असल्याचे मास्टरकार्डने जाहीर केले आहे. मास्टरकार्डचे सर्व तंत्रज्ञान, सर्व्हर हे अमेरिकेबाहेर असणारा भारत हा पहिला देश ठरणार आहे.