मुंबई - रोशेस इंडियाने कोरोनाच्या उपचारासाठी नवीन औषध बाजारात उपलब्ध करण्याचे जाहीर केले आहे. हे औषध कॅसिरीविमॅब आणि इमडेविमॅब या अँटीबॉडी कॉकटेलचे संमिश्र आहे. या औषधाची सिप्लाकडून मार्केटिंग करण्यात येणार आहे.
अँटीबॉडी कॉकटेलच्या दुसऱ्या बॅचचे उत्पादन जूनच्या मध्यात घेतले जाणार आहे. या औषधाचे १ लाख पॅकेट्स भारतात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे २ लाख रुग्णांना लाभ मिळू शकणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. औषधाच्या एका डोसची किंमत ही ५९,७५० रुपये आहे. तर मल्टी डोस पॅकची किंमत जास्तीत जास्त १,१९,५०० रुपये आहे.
हेही वाचा-तीन दिवसात राज्यांना मिळणार ४८ लाख लशींचे डोस - केंद्र सरकार
सार्स-कोव्ह-२ या विषाणुला अटकाव करण्यासाठी खास औषधाची निर्मिती-
कॅसिरीविमॅब आणि इमडेविमॅब हे इंजेक्शन दोन मोनोक्लोनल अँटिबॉडिजचे मिश्रण आहे. सार्स-कोव्ह-२ या विषाणुला अटकाव करण्यासाठी या अँटीबॉडीजची खास निर्मिती करण्यात आली आहे. सार्स-कोव्ह-२ या विषाणुमुळे कोरोना हा संसर्गजन्य उद्भवतो. मोनोक्लोनल अँटीबॉडीजची रेकोम्बिनन्ट डीएनए तंत्रज्ञानाने निर्मिती करण्यात आली आहे.
हेही वाचा-'स्पूटनिक व्ही'चे पॅनासिया बायोटेककडून हिमाचल प्रदेशमध्ये उत्पादन सुरू
रुग्णांमधील मृत्यूचे प्रमाण ७० टक्क्यांनी कमी होत असल्याचा दावा-
संमिश्र औषधाने अतिजोखीम गटातील रुग्णांना गंभीर प्रकृतीपूर्वी फायदा होऊ शकतो, असा कंपनीने दावा केला आहे. तसेच रुग्णांमधील मृत्यूचे प्रमाण आणि रुग्णालयातील कालावधी हा ७० टक्क्यांनी कमी होत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कोरोनाची लक्षणे कमी होण्याचा कालावधी हा चार दिवसांनी कमी होतो.
सिप्लाच्या नफ्यात वाढ-
सिप्ला कंपनीचा चौथ्या तिमाहीत निव्वळ नफा ७३ टक्क्यांनी वाढून ४१२ कोटी रुपये झाला आहे. मुंबईस्थित सिप्लाने जानेवारी २०१९ ते मार्च २०२० दरम्यान २३८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळविला होता. कोरोना महामारीत औषधांची मागणी वाढल्याने सिप्लाच्या नफ्यात वाढ झाली आहे.