नवी दिल्ली - बँकेविषयी खोट्या बातम्या आणि अफवा पसरविणाऱ्याविरोधात बँक ऑफ महाराष्ट्राने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत अफवा व्हॉट्सअॅप आणि इतर समाज माध्यमातून पसरल्याने बँकेची प्रतिमा मलिन होत असल्याचे बँकेकडून म्हटले आहे.
बँकेने पोलिसात दिलेल्या तक्रारीची शेअर बाजाराला माहिती दिली आहे. अफवा पसरविणाऱ्या न्यूज पोर्टल आणि ट्विटर हँडलची बँक ऑफ महाराष्ट्राने पोलिसांत माहिती दिली आहे. या अफवांचे उगमस्थान शोधून काढावे, अशी बँकेने यंत्रणेला विनंती केली आहे. तसे कृत्य करणाऱ्याविरोधात कठोर कारवाई करावी, अशी बँकेने यंत्रणेकडे मागणी केली.
बँकेत चांगले भांडवल तसेच २ कोटी ७० लाखांहून अधिक एकनिष्ठ ग्राहक असल्याचे बँकेने म्हटले आहे. चुकीची माहिती प्रसिद्ध झाल्याने लोकांची दिशाभूल होत असल्याचे बँक ऑफ महाराष्ट्रकडून म्हटले आहे. सर्व मूल्यवान भागीदारांचे हितसंरक्षण करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र बांधील आहे. चुकीच्या माहितीवर तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे बँक ऑफ महाराष्ट्रकडून आवाहन केले आहे.