नवी दिल्ली - योगगुरू स्वामी रामदेव यांचे लहान बंधू राम भारत आणि विश्वासू सहकारी आचार्य बाळकृष्ण हे रुची सोया कंपनीच्या संचालक मंडळावर असणार आहेत. नुकतेच पंतजलीने रुची सोया ही कंपनी खरेदी केली आहे. राम भारत आणि आचार्य बाळकृष्ण यांना संचालकपदासाठी वार्षिक वेतन एक रुपया मिळणार आहे.
रुची सोया इंडस्ट्रीज कंपनीने व्यवस्थापकीय संचालकपदावर राम भारत यांची नियुक्ती करण्यासाठी समभागधारकांना नोटीस दिली आहे. कंपनीच्या संचालकाच्या निवडीसाठी समभागधारकांची मंजुरी मिळणे आवश्यक असते. गतवर्षी पतंजली आयुर्वेद, दिव्ययोग मंदिर ट्रस्ट, पतंजली परिवहन आणि पतंजली ग्रामोद्योग कंपनीने नादारी प्रक्रियेतील रुची सोया कंपनी खरेदी केली. त्यानंतर नव्या व्यवस्थापनाला संचालक मंडळ नेमण्याचे अधिकार मिळाले आहेत.
हेही वाचा-दिलासादायक! महामारीत एप्रिल ते सप्टेंबरमध्ये थेट विदेशी गुंतवणुकीत १५ टक्क्यांनी वाढ
दोन्ही संचालकांना वार्षिक वेतन १ रुपया!
रुची सोयाच्या संचालक मंडळाची बैठक १९ ऑगस्ट २०२० झाली आहे. यामध्ये राम भारत यांची १९ ऑगस्ट २०२० ते १७ डिसेंबर २०२२ पर्यंत व्यवस्थापकीय संचालकपदावर नियुक्ती झाली आहे. यापूर्वी ते कंपनीचे पूर्णवेळ संचालक होते. भारत यांना वार्षिक १ रुपया वेतन मिळणार आहे. आचार्य बाळकृष्ण हे कंपनीचे चेअरमन असणार आहेत. त्यांनाही वार्षिक वेतन १ रुपया मिळणार आहे. ४८ वर्षीय रामदेव यांची संचालकपदी निवड होण्यासाठीही समभागधारकांची मंजुरी मिळवावी लागणार आहे. याशिवाय गिरीश कुमार आहुजा, ज्ञानसुधा मिश्रा आणि ताजेंद्र मोहन भसीन यांची स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे.
हेही वाचा-पेट्रोलचे दर प्रति लिटर ८२ रुपयांहून अधिक; नऊ दिवसात आठव्यांदा दरवाढ
गतवर्षी रामदेव यांची मालकी असलेल्या पतंजली आयुर्वेदने ४,३५० कोटी रुपयांनी रुची सोया या कंपनीचे खरेदी केली आहे. त्यामुळे पतंजलीला खाद्यतेल आणि सोयाबीन तेल उद्योगात नव्याने व्यवसाय करणे शक्य होणार आहे.