नवी दिल्ली – अॅक्सिस बँकेने सुमारे 1 हजार लोकांना नोकरी देण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी बँकने 'गिग अ -ऑपर्च्युनिटीज' हा उपक्रम सुरू केला आहे. यामधून घरातूनही काम करू शकेल असे कौशल्य असलेले उमेदवार निवडता येणार आहेत.
नव्या नोकऱ्यांच्या संधीबाबत माहिती देताना अॅक्सिस बँकेचे कार्यकारी संचालक राजेश दहिया म्हणाले, की पुढील एका वर्षात 800 ते 1 हजार लोकांना नोकरी देण्यात येणार आहे. या नोकऱ्या नेहमीप्रमाणे असलेल्या नोकऱ्यांप्रमाणे परिणामकारक असणार आहेत. यापूर्वी नोकरी म्हणजे ऑफिसला यावे लागते असा समज होता. मात्र घरातून काम करण्याची संकल्पना पूर्णपणे बदलली आहे. सुरुवातीला घरातून काम करणे कर्मचारी टाळत होते. मात्र, ते आता घरातून काम नेहमीप्रमाणे करत आहेत. घरातून काम करणेदेखील खूप उत्पादक आणि परिणामकारक असल्याचे सिद्ध झाले आहे.
बँकेकडून बुद्धिवान, तरुण, मध्यम अनुभवी आणि महिलांची देशभरातून निवड करता येणार आहे. या नोकऱ्या अर्धवेळ नसून पूर्णवेळ आहेत. हा प्लॅटफॉर्म सुरू केल्यानंतर तीन ते चार दिवसांत देशभरातून तीन हजार नोकरीसाठी अर्ज आले आहेत. आम्ही लोकांच्या गुणवत्तेबाबत तडजोड करणार नाही. त्यामुळे देण्यात येणाऱ्या वेतनाबाबतही तडजोड करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, अॅक्सिस बँकेत 80 हजारांहून अधिक कर्मचारी सेवेत आहेत.