अहमदाबाद - यंदा उन्हाळा लवकर सुरू होताच आईस्क्रीमची मागणी वाढल्याचे अमुल कंपनीने म्हटले आहे. तसेच आईस्क्रीमच्या किमती वाढणार नसल्याचेही कंपनीने संकेत दिले आहेत.
अमुल ब्रँडची मालकी असलेल्या जीसीएमएमएफचे व्यवस्थापकीय संचालक आर. एस. सोधी हे ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले की, उन्हाळ्याची यंदा चांगली सुरुवात झाली आहे. आमच्या आईस्क्रीमच्या विक्रीत फेब्रुवारीत गतवर्षीच्या तुलनेत 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
गेल्या काही महिन्यांत विक्री सुधारणा झाल्याने कोरोनाच्या टाळेबंदीने झालेले नुकसान भरून निघत आहे. वर्षभरातील झालेले नुकसान हे मार्च ते एप्रिलमधील विक्रीने कमी होते.
हेही वाचा-हिरो समुहाच्या मानद चेअरमनच्या पत्नी संतोष मुंजाल यांचे निधन
गतवर्षी टाळेबंदीमुळे आईसस्क्रीम विक्रीवर मोठा परिणाम-
गतवर्षी 30 जानेवारीला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर काही आठवड्यांनी संपूर्ण देशात कोरोनाचा संसर्ग पसरला होता. त्यामुळे केंद्र सरकारने मार्चअखेरच्या शेवटच्या आठवड्यात टाळेबंदी लागू केली होती. देशभरात दोन महिने कडक टाळेबंदी लागू असल्याने अनेक उद्योगांवर परिणाम झाला होता. लोकांना घराबाहेर पडण्यास निर्बंध असल्याने आईस्क्रीमसारख्या उद्योगांना मोठा फटका बसला होता.
अमुलचा आईसस्क्रीमच्या बाजारपेठेत 40 टक्के हिस्सा आहे. मात्र, गतवर्षी एप्रिलमध्ये आईस्क्रीमच्या विक्रीत एप्रिल 2019 च्या तुलनेत 85 टक्क्यांनी घसरण झाली होती. चालू आर्थिक वर्षात आईसस्क्रीमच्या विक्रीत किती वाढ होईल, असा प्रश्न विचारला असता आर. एस. सोधी यांना कोरोनापूर्वीच्या काळाहून 20 टक्क्यांनी विक्रीत वाढ होईल, असे त्यांनी सांगितले. त्यामागे चांगला उन्हाळा आणि किमतीबाबतचे धोरण असल्याचे सोधी यांनी सांगितले. गेल्या 15 महिन्यांत आईस्क्रीमच्या किमती बदलण्यात आल्या नाहीत. सध्या किमती लवकर वाढणार नाहीत, असा अंदाज आहे.
हेही वाचा-सलमान खानची चिंगारीमध्ये गुंतवणूक; ब्रँड अॅम्बेसेडर म्हणूनही करणार काम
आईस्क्रीम विक्रेत्यांना सर्वोत्तम मदत-
आर. एस. सोधी यांच्या माहितीनुसार आईसस्क्रीम विक्रेत्यांना कोरोनाच्या काळात संकटाला खूप सामोरे जावे लागले आहे. अनेकांना वीज बिलही भरता आले नव्हते. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे टाळेबंदी ही सामान्य बाब होत आहे. किरकोळ विक्रेत्यांचा उदरनिर्वाह वाचविण्याकडे लक्ष केंद्रित असल्याचे आर. एस. सोधी यांनी सांगितले.
गतवर्षीप्रमाणे पुन्हा समस्या येईल, ही आईसस्क्रीम विक्रेत्यांना चिंता वाटत आहे. त्यांचा उदरनिर्वाह वाचविण्यासाठी आम्ही विविध प्रशासनाशी संपर्क करत आहोत, अशी आर. एस. सोधी यांनी माहिती दिली.