सीटल - अॅमेझॉनने टाळेबंदीत १ लाख ७५ हजार कर्मचाऱ्यांना हंगामी नोकऱ्या देवून दिलासा दिला होता. त्यानंतर कंपनीने या कर्मचाऱ्यापैकी सव्वा लाख कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी नोकरी देण्याची ऑफर केली आहे. या कर्मचाऱ्यांना कंपनीने मार्चमध्ये नोकरीत घेतले होते.
कायमस्वरुपी नोकरीची ऑफर मिळालेल्या नसलेल्या कर्मचाऱ्यांना हंगामी नोकरी सुरू ठेवण्याची अॅमेझॉनने संधी दिली आहे. अॅमेझॉनकडून सुमारे सहा लाख कर्मचाऱ्यांना प्रति तास १५ डॉलर (सुमारे १ हजार १२५ रुपये) दिले जातात.
हेही वाचा-टाळेबंदीने उपासमार; व्यवसाय सुरू करण्याची फूल विक्रेत्यांची सरकारकडे मागणी
कोरोनाच्या संकटामुळे अनेक लोक खरेदी करण्यासाठी घरामधून बाहेर पडत नाहीत. त्यामुळे घरपोच खरेदीचे प्रमाण वाढल्याने अॅमेझॉनच्या व्यवसायात मोठी वाढ झाली आहे. ग्राहकांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी अॅमेझॉनने १ लाख ७५ हजार जणांना हंगामी नोकरीत घेतले आहे.
हेही वाचा-टोळधाडीचे आव्हान; कृषी मंत्रालय विदेशामधून मागविणार फवारणी यंत्र
अॅमेझॉनने भारतातही ५० हजार कर्मचाऱ्यांना दिल्या नोकऱ्या-
अॅमेझॉनचे वरिष्ठ अधिकारी अखिल सक्सेना म्हणाले, की ग्राहकांना हवे असलेल्या वस्तू देवून आम्ही मदत करणार आहोत. त्यामुळे ग्राहक प्रत्यक्षात शारीरिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) ठेवू शकणार आहेत. हे शक्य करण्यासाठी आम्ही ५० हजार नोकऱ्यांच्या संधी निर्माण करत आहोत. त्यांना महामारीच्या काळात सुरक्षित वातावरण उपलब्ध करून दिले जाणार आहे. ग्राहक, भागीदार आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी बांधील राहणार असल्याचेही अॅमेझॉनने म्हटले आहे.
कोरोनाच्या संकटाने ऑनलाईन खरेदीत वाढ-
कोरोना प्रसार वाढत असल्याने दैनंदिन वस्तुंसाठी ग्राहकांनी ऑनलाईन खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टमध्ये स्पर्धा सुरू आहे.