नवी दिल्ली - रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अॅमेझॉन इंडियाने तिकीट बुकिंगच्या सेवेत विस्तार केला आहे. त्यासाठी कंपनीने आयआरसीटीसीबरोबर भागीदारी केली आहे. या भागीदारीतून ग्राहकांना रेल्वेची तिकिटे आरक्षित करता येणार आहेत.
तिकीट आरक्षणाची सेवा सुरू केल्यानंतर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अॅमेझॉनने सवलत जाहीर केली आहे. अॅमेझॉन पेमधून रेल्वे तिकीट आरक्षित केल्यास सेवाशुल्क माफ करण्यात येणार आहे. यामधून ग्राहकांना विमान व बसची तिकिटेही आरक्षित करता येत असल्याचे अॅमेझॉनने म्हटले आहे.
अॅमेझॉन पेमधून पहिल्यांदाच रेल्वे तिकीट बुक करणाऱ्या ग्राहकांना कॅशबॅक मिळणार असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. अॅमेझॉन अॅपमधून ग्राहकांना रेल्वेतील आरक्षित आसने व आसनांची उपलब्धता याची माहिती मिळू शकणार आहे. अॅमेझॉन पे अॅप वॉलेटमधील पैशामधूनही ग्राहकांना रेल्वे तिकिटे खरेदी करता येणार आहेत.
ग्राहकांना अॅमेझॉन पेमधून पीएनआरची स्थिती समजू शकणार आहे. तिकीट रद्द झाले तर ग्राहकांना त्वरित पैसे मिळणार असल्याचा कंपनीने दावा केला. अॅमेझॉन पेचे संचालक विकास बन्सल म्हणाले की, गतवर्षी अॅमेझॉन पेमधून विमान आणि बसची तिकिटे आरक्षित करण्याची सेवा सुरू केली होती. यामध्ये रेल्वे तिकीटाच्या आरक्षणाची नवी सेवा देण्यात येत आहे.