नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँकेची भूषण पॉवर आणि स्टील कंपनीने कोट्यवधींची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर आता या कंपनीने अलाहाबाद बँकेची १ हजार ७७५ कोटींची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
भूषण पॉवर आणि स्टील कंपनीने फसवणूक केल्याची माहिती अलाहाबाद बँकेने शेअर बाजाराला दिली आहे. तसेच फसवणूक झाल्याची माहिती देणारा अहवाल बँकेने भारतीय रिझर्व्ह बँकेला दिला आहे. फॉरेन्सिक लेखापरीक्षण, तपास तसेच सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर भूषण पॉवर आणि स्टील कंपनीने फसवणूक केल्याचे आढळून आले. ही फसवणूक १ हजार ७७४.८२ कोटींची आहे. सध्या राष्ट्रीय कंपनी लवाद प्राधिकरणाकडे भूषण पॉवर आणि स्टील कंपनीचे कर्ज प्रकरण आहे. यामधून बँकेला चांगली वसुली होईल अशी अपेक्षा आहे.
सीबीआयच्या माहितीनुसार बीपीएसएलने २ हजार ३४८ कोटी रुपये कंपनीचे संचालक व कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वळविण्यात आली. ही रक्कम पंजाब नॅशनल बँक, युको बँक, आयडीबीआय बँक, ओरियन्टल बँक ऑफ कॉमर्स बँकांच्या कर्ज खात्यावर होती. कंपनीने २०० बनावट कंपन्या सुरू केल्या होत्या. सीबीआयने कंपनीचे चेअरमन संजय सिंघल, उपाध्यक्ष आरती सिंघल आणि इतर संशयित संचालकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
कंपनीने विविध वित्तीय संस्था व ३३ सरकारी बँकांकडून २००७ ते २०१४ दरम्यान ४७, २०४ कोटींचे कर्ज घेतले. ते कर्ज थकविले आहे. पंजाब नॅशनल बँकेने कर्ज एनपीए घोषित केल्यानंतर इतर वित्तीय संस्था व बँकांनी कर्ज एनपीए घोषित केल्याचे सीबीआयने माहिती दिली.