बंगळुरू - बँकेच्या एटीएममध्ये जाण्याची गरज पडणार नाही, अशी सुविधा डिजीटल व्यवहाराची सेवा देणाऱ्या 'फोनपे'ने आणली आहे. ग्राहकांना रोकड हवी असल्यास त्यांना जवळच्या दुकानामधून फोनपे वापरून पैसे मिळू शकणार आहेत.
ग्राहकांना रोकड हवी असल्यास त्यांना फोनपे अॅपमधून स्टोअर्स या पर्यायावर जावे लागणार आहे. तिथे फोनपे एटीएमचा पर्याय निवडल्यास रोकड देवू शकणाऱ्या दुकानांची यादी दिसणार आहे. त्यामधील जवळील दुकान निवडून ग्राहकांना पैसे घेता येणार आहेत.
हेही वाचा-डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब दावा म्हणाले, चीन-भारताप्रमाणे अमेरिकाही विकसनशील देश!
सध्या प्रायोगिकतत्वावर ही सेवा दिल्ली-एनसीआर भागात उपलब्ध आहे. या सेवेमधून ग्राहकांना दिवसभरात जास्तीत जास्त १ हजार रुपये काढता येतात.
अशी वापरता येणार सेवा-
- जवळील दुकानात गेल्यानंतर तिथे फोनपेमधील 'विथड्रॉ'चे बटन निवडा.
- त्यानंतर त्या दुकानदारांच्या फोनपे अकाउंटवर जेवढे पैसे घ्यायचे, तेवढे पैसे पाठवा.
- दुकानदाराच्या फोनपेवर पैसे जमा होताच तेवढी रक्कम ग्राहकाला मिळणार असल्याचे फोनपे कंपनीने म्हटले आहे.
हेही वाचा-एजीआर शुल्क भरण्याची आज शेवटची मुदत; एअरटेलने 'ही' घेतली भूमिका
फोनपे एटीएम सेवेमधून ग्राहकाला ठराविक दुकानदारांकडूनच पैसे घेता येणार आहेत. या सेवेमुळे दुकानदारांना रोकड जास्त ठेवण्याचा त्रास कमी होणार आहे. त्यांना विविध बँकामध्ये पैसे जमा करण्यासाठी लागणारा वेळ वाचवणार असल्याचे फोनपेचे व्यवसाय विकास प्रमुख विवेक लोहशेब यांनी सांगितले. फोनपे एटीएमच्या सेवेत ग्राहक आणि दुकानदारांकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.