नवी दिल्ली - व्हॉट्सअॅपचे जागतिक प्रमुख विल कॅथकार्ट हे पुढील आठवड्यात भारत भेटीवर येणार आहेत. यादरम्यान ते माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि आरबीआयच्या अधिकाऱ्यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
कॅथकार्ट यांनी चालू वर्षात मार्चमध्ये पदभार घेतल्यानंतर त्यांची ही पहिलीच भारत भेट असणार आहे. ते दिल्ली व मुंबई शहराला भेट देणार आहेत. नीती आयोगाने डिजीटल समावेशकतेसाठी २५ जुलैला कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्या कार्यक्रमाला कॅथकार्ट हे उपस्थित राहणार आहेत.
वरिष्ठ नेत्यांबरोबर कॅथकार्ट यांची बैठक असल्याचे व्हॉट्सअॅपच्या प्रवक्त्याने सांगितले. या बैठकीत डिजीटल इंडियासाठी व्हॉट्सअॅपकडून काय मदत करता येईल, याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. तसेच आर्थिक विकासाला गती देण्यासाठी व्हॉट्सअॅपकडून आंत्रेप्रेन्युअर आणि छोट्या उद्योगांना मदत करण्याबाबतही चर्चा करण्यात येणार आहे.
खोट्या बातम्यांमुळे व्हॉट्सअॅप पडले होते वादाच्या भोवऱ्यात-
खोट्या बातम्यांवर आळा घालण्यासाठी यापूर्वी केंद्र सरकारने व्हॉट्सअॅप कंपनीवर दबाव वाढविला होता. व्हॉट्सअॅपमुळे मॉब लिचिंगच्या घटना घडल्याने गेल्या वर्षी मृत्यू १२ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.
पेमेंट सेवेचा विस्तार करण्याचे कंपनीकडून प्रयत्न-
गतवर्षी फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअॅपने पेमेंट सेवेची चाचणीही घेतली होती. कंपनीकडून देशभर पेमेंट सेवेचा विस्तार करण्याबाबत विचार चालू आहे. या सेवेला पेटीएम, फोनपे आणि गुगल पेच्या स्पर्धेला तोंड द्यावे लागणार आहे. पेमेंट सेवा देणाऱ्या कंपन्यांचे डेटा सेंटर देशात ठेवण्याचे आरबीआयने नियम लागू केले आहेत. त्यामुळे व्हॉट्सअॅपने गतवर्षी ऑक्टोबरमध्ये डेटा देशातच ठेवण्याची यंत्रणा विकसित केल्याचा दावा केला होता.
देशात २० कोटी वापरकर्ते असल्याने व्हॉट्सअॅपसाठी भारत ही मोठी बाजारपेठ आहे.