शिवकाशी (तामिळनाडू) - सर्वोच्च न्यायालयाने प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवर ऑक्टोबर २०१८ पासून बंदी घातली आहे. त्याचा परिणाम म्हणून येथील कारखान्यामधील कामगार आणि फटाके उत्पादकांना त्यांचा उदरनिर्वाह आणि व्यवसाय संपुष्टात येणार असल्याची भीती होती. हरित फटाक्यांची घोषणा केल्यानंतर या उद्योगाला काहीसा दिलासा मिळाला. मात्र शिवकाशीमधील ९० टक्के फटाके उत्पादकांना अजूनही हरित फटाके माहित नाहीत.
श्री वेलवन फायरवर्क्सचे मालक एन. एलानगोवान म्हणाले, सीएसआयआर-एनईईआरआयच्या संस्थेने तयार केलेल्या फॉर्म्युल्यात बेरियम नायट्रेटचा वापर करण्यात आला नाही. त्याशिवाय फटाके तयार करणे आम्हाला शक्य नाही. हरित फटाके हे भूईचक्रे, फुलझाड, फुलबाजी अशा ठरावीक उत्पादनामध्ये वापरणे शक्य होत असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवकाशीमधील उद्योग हे गेल्या ९५ वर्षापासून फटाके उत्पादन घेत आहेत. त्यांना रासायनिक घटकांची पूर्ण माहिती असल्याने पर्यायी घटकांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे प्रदूषण कमी होते, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा-संसदेच्या इमारतीचा पुनर्विकास करण्याकरता गुजरातची कंपनी देणार सल्ला; 229 कोटींचा येणार खर्च
शिवकाशी परिसरात १ हजार १५० फटाक्यांचे कारखाने आहेत. त्यापैकी तीन कारखान्यांनी हरित फटाके तयार करण्याचे निकष पूर्ण केले आहेत. हरित फटाक्यांची निर्मिती करण्याची कामगारांची इच्छा असल्याचे फटाक्यांचे वितरक आणि किरकोळ विक्रेते जी. डॅनियल यांनी सांगितले. मात्र त्याबाबतची माहिती व प्रशिक्षण नसल्यामुळे तसे शक्य होत नसल्याची त्यांनी माहिती दिली. नव्या संशोधन अथवा तंत्रज्ञानामधून घेण्यात येणाऱ्या उत्पादनाचा खर्च बहुतांश जास्तच असतो. हरित फटाक्यांच्या उत्पादनाचा खर्चही जास्त असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा-'आरसीईपी हा पंतप्रधानांनी अर्थव्यवस्थेला दिलेला तिसरा मोठा धक्का ठरणार'
काय आहेत हरित फटाके-
हरित फटाके हे पर्यावरणस्नेही मानली जातात. त्यामधून वातावरणाचे ३० टक्के कमी प्रदूषण होते. या फटाक्यांची निर्मती वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन (सीएसआयआर) आणि राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (एईईआरआय) केली आहे. या संशोधन संस्थांनी बेरियम नायट्रेट हे प्रदूषण करण्यात महत्त्वाचा घटक असल्याचे दाखवून दिले. त्याला पर्यायी घटकांचा फटाक्यात वापर केला तर प्रदूषण कमी होते.