नवी दिल्ली - केंद्रामधील भाजप सरकार मुख्य मुद्द्यावरून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा काँग्रेसने आरोप केला. मागील सरकारच्या काळात येस बँकेने दिलेल्या कर्जात अचानक कशी वाढ झाली, याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
येस बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने तात्पुरते निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे खातेदारांना जास्तीत जास्त ५० हजार रुपये खात्यामधून काढता येतात. येस बँकेचे ग्राहक चिंतेत आहेत. यावरून काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, की काँग्रेस हे चाकावर झोपले होते का? किंवा जाणीवपूर्वक येस बँक बुडण्यात भाजप सहभागी होती का?
हेही वाचा-कोरोना भयग्रस्त बाजारात १,९४१ अंशांनी पडझड; गुंतवणूकदारांना गमावले ७ लाख कोटी
येस बँक कशी बुडाली? येस बँक बुडण्याला कोण जबाबदार आहे? मोदीजी तुम्ही उत्तर द्या. मार्च २०१४ मध्ये असलेले बँकेचे कर्ज ५५ हजार कोटी रुपयांहून मार्च २०१९ दरम्यान २ लाख ४१ हजार ४९९ कोटी रुपये कर्ज झाले. नोटाबंदीनंतर दोन वर्षात येस बँकेच्या कर्जात १०० टक्के वाढ झाली आहे.
हेही वाचा-येस बँकेच्या संस्थापकाकडून ४,३०० कोटी रुपयांचे मनी लाँड्रिंग - ईडी
भाजपचा येस बँकेशी आणि त्यांच्या मालकाशी काय संबंध आहे, हा प्रश्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येस बँकेने पुरस्कृत केलेल्या ६ मार्च २०२० च्या परिषदेत का संबोधित केले? नितीन गडकरी येस बँकेच्या मालकाच्या निवासस्थानी काय करत होते? हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल यांनी येस बँकेत १ हजार कोटी रुपयांच्या ठेवी कशाला ठेवल्या? महाराष्ट्र सरकारने महापालिकांचे १ हजार कोटी येस बँकेत कसे ठेवले? गुजरात सरकारने बँकेमधून कसे पैसे काढले, असे विविध प्रश्न सुरजेवाला यांनी उपस्थित केले.