नवी दिल्ली - नेस वाडिया यांना अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी जपान न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. याचे पडसाद म्हणून वाडिया ग्रुपच्या शेअरमध्ये १० टक्क्यापर्यंत घसरण झाली आहे.
बॉम्बे डायिंगच्या शेअरमध्ये ९.७८ टक्के घसरण होऊन ११२.६० रुपयावर बंद झाला. तर ब्रिटानिया इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये २.५० टक्के घसरण होऊन तो २ हजार ८९३ रुपये १० पैशांवर बंद झाला. बॉम्बे बुरमाह ट्रेडिंग कॉर्पोरेशनच्या शेअरमध्येही २.४० टक्के घसरण झाली. शेअर बाजार बंद होताना त्याचा दर हा १ हजार २४१ रुपये ३० पैसे होता.
नेस वाडिया यांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेबाबत बीएसईने तिन्ही कंपन्याकडून माहिती मागविली आहे.
काय आहे न्यायालयाची शिक्षा-
उद्योगपती नुस्ली वाडिया यांचे पुत्र नेस यांना अमली पदार्था जवळ बाळगणे चांगलेच भोवले आहे. अमली पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी जपानच्या न्यायालयाने नेस वाडियांना दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. मात्र ही शिक्षा ५ वर्षांसाठी निलंबित ठेवण्यात आली आहे. पुढील ५ वर्षांच्या काळात नेस यांनी जपानमध्ये गुन्हा केल्यास त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात येणार आहे. नेस वाडिया सध्या भारतात आहे. त्यांच्यावर असलेल्या जबाबदारीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे वाडिया कंपनीच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले.