सॅनफ्रान्सिस्को – वापरकर्त्यांच्या माहितीबाबत गुगलकडूनही दक्षता घेतली जात नसल्याचे समोर आले आहे. गुगलने अँड्राईड लॉकबॉक्स नावाने अंतर्गत कार्यक्रम सुरू केला आहे. यामध्ये टिकटॉक, फेसबुकसारख्या अॅपचा वापर अँड्राईडचे वापरकर्ते कसा करतात, याची पाहणी गुगलचे कर्मचारी करतात.
यूट्युबची प्रतिस्पर्धी असलेल्या टिकटॉकसारख्या कंपन्यांची माहिती मिळविण्यासाठी बाजारपेठेचे संशोधन करावे लागते. त्यासाठी गुगलने कर्मचाऱ्यांना महत्त्वाचे साधन उपलब्ध करून दिले आहे. त्यामध्ये वापरकर्ते टिकटॉकचा कसा वापर करतात, हे गुगलच्या कर्मचाऱ्यांना समजू शकते. हे काम गुगल मोबाईल सर्व्हिसेसमधून चालते. गुगलकडून यूट्युब शॉर्ट हे अॅप तयार करण्यात येत आहे.
दरम्यान, गुगलसह बड्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या बाजारामधील अनुचित पद्धती आणि संशोधनातील वर्चस्वाविरोधात अमेरिकन सरकार कारवाई करण्याच्या तयारीत आहे. गेल्या वर्षी अमेरिकन समितीने तंत्रज्ञान कंपन्यांची चौकशी करणार असल्याचे जाहीर केले होते. वापरकर्त्यांचा डाटा गोळा करण्याचे आरोप यापूर्वी गुगलसह फेसबुकवरही करण्यात आले आहेत.
फेसबुकचे वापरकर्ते मोबाईलवरून दुसरे कोणते अॅप वापरतात, ही माहिती मिळविण्यासाठी कंपनीने ओनावो प्रोटेक्ट या व्हीपीएन सेवेचा वापर केला होता. ही सेवा 2019 मध्ये बंद करण्यात आली आहे.