वॉशिंग्टन - अमेरिका आणि चीन या दोन आर्थिक महासत्तामधील व्यापारी वाद शिगेला पोहोचला आहे. चीनच्या उत्पादनांवरील आयात शुल्क वाढविण्याची तयारी केल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. ते माध्यमांशी व्हाईट हाऊसमध्ये बोलत होते.
चीनने अमेरिकेच्या ६ हजार कोटी डॉलर मुल्यांच्या उत्पादनावरील आयातशुल्क १० टक्क्यावरून २५ टक्के वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने चीनच्या उत्पादनावरील आयात शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर चीनने हा निर्णय घेतला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी पलटवार करण्याची चीनला धमकी दिली आहे.
काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प -
आम्हाला चीनच्या ३२ हजार ५०० कोटी डॉलर मुल्यांच्या उत्पादनावर २५ टक्के अतिरिक्त आयात शुल्क लागू करण्याचा अधिकार आहे. ही प्रचंड रक्कम आपल्या देशात येवू शकते. अद्याप मी अजून निर्णय घेतला नाही. आपण ज्या स्थितीमध्ये आहोत, ही स्थिती मला आवडते. ते काही प्रमाणात प्रत्यूत्तर देऊ शकतात, मात्र ते तुलनेने खूप कमी व अंशत: आहे. अब्जावधी डॉलर आपण घेत आहोत. त्यातील काही भागच आपल्या शेतकऱ्यांकडे जात आहे. कारण चीन आपल्याला प्रत्युत्तर देत आहे. ते काही प्रमाणात आपल्या शेतकऱ्यांविरोधात असल्याचे सांगत त्यांनी चीनबद्दलची नाराजी व्यक्त केली. चीनच्या निर्णयाने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल, याची चिंता करत नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले.
अमेरिकन सरकार शेतकऱ्यांना देणार आर्थिक पॅकेज-
चीनच्या आयात शुल्काने नुकसान झाल्यास अमेरिकन सरकार शेतकऱ्यांना १ हजार ५०० कोटी डॉलरची आर्थिक मदत करण्याचे नियोजन करत आहे. ट्रम्प म्हणाले, आपले शेतकरी श्रेष्ठ असे देशभक्त आहेत. त्यांनी खूप चांगले काम केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेतली जाणार आहे.
गेल्या आठवड्यात शुक्रवारी चीन व अमेरिकेदरम्यान व्यापारी विषयाबाबत बैठक पार पडली. मात्र दोन्ही देशांना व्यापारी वादाबाबत तोडगा काढण्यात यश आले नाही. त्यानंतर दोन देशामधील व्यापारी युद्ध पुन्हा एकदा पेटले आहे.