नवी दिल्ली - टाटा ग्रुपने देशातील ऑक्सिजनच्या पूर्ततेसाठी जर्मनीमध्ये ऑक्सिजनचे 24 टँकर खरेदी केले आहेत. हे टँकर ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता वाढविण्यासाठी भारतामध्ये आणले जाणार आहेत.
भारतामधील जर्मनीच्या राजदूत कार्यालयाने सोशल मीडियावर ट्विट करत टाटाने खरेदी केलेल्या टँकरची माहिती दिली आहे. राजदूत कार्यालयाने ट्विटमध्ये म्हटले, की जर्मनीमधील लिंडे ग्रुपच्या मदतीने टाटाने 24 टँकर सुरक्षित केले आहेत. या ऑक्सिजन टँकरचा वापर कोरोना हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी केला जाणार आहे.
हेही वाचा-राज्यात लॉकडाऊन लागू; परप्रांतीय मजुरांनी धरली गावाकडची वाट
टाटा ग्रुपकडून मदत करण्याचे जाहीर-
दरम्यान, टाटा ग्रुपने समाज माध्यमात 21 एप्रिलला कोरोनाच्या लढ्यात बळ वाढविण्यासाठी शक्य ते करण्यासाठी बांधील असल्याचे म्हटले होते. तसेच ऑक्सिजनचे संकट दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे टाटा ग्रुपने म्हटले आहे. ग्रुपचे अधिकारी म्हणाले, की टास्कफोर्सकडून आवश्यक वैद्यकीय साधने आणण्यासाठी विनंती केली जात आहे. टाटा ग्रुपकडून विलगीकरण केंद्र हॉस्पिलटमध्ये ऑक्सिजन पुरविण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. केंद्र सरकारनेही भारतीय हवाई दलाला जर्मनीवरून ऑक्सिजन कंटेनर आणि इतर साधने आणण्याचे आदेश दिले आहे.
हेही वाचा-साखर कारखान्यांनी ऑक्सिजनची निर्मिती करावी- शरद पवारांचे आवाहन
सैन्यदलाची मदत घेण्याचे केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू-
देशामध्ये ऑक्सिजन वाहतुकीसाठी पुरेशी साधने नसल्याने ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून संबंधितांशी चर्चा केली जात आहे. नुकतेच केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण आस्थापनांना अधिक कोरोना रुग्णालये सुरू करण्याचे निर्देश दिले आहे. आपत्पकालीन अधिकाराचा वापर करून निवृत्तांनाही संकटावर मात करण्यासाठी बोलाविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सैन्यदलाच्या पायाभूत सुविधांचा वापर कोरोनाच्या लढ्यात कसा करता येईल, याविषयीच्या रोडमॅपबाबत संरक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत चर्चा करण्यात आली आहे.