मुंबई - देशाच्या आर्थिक राजधानीत कोरोनाचे थैमान सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळावर प्रशासनाने कोरोनाच्या काळातील नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरी विमान वाहतूक संचालनालयाच्या (डीजीसीए) निर्देशाप्रमाणे नियमांचे उल्लंघन केल्यास १ हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय विमानतळ प्रशासना घेतला आहे.
जर विमानतळावर प्रवाशाकडून नियमांचे उल्लंघन होत असेल तर कठोर कारवाई करण्याचे निर्देश डीजीसीएने विमानतळ प्रशासनाला दिले आहेत. या निर्देशाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने (सीएएसआयए) नियमांचे उल्लंघन केल्यास १ हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची १ एप्रिलपासून अंमलबजावणी करण्यात येत आहे.
हेही वाचा-फ्रान्समध्ये कोरोनाची तिसरी लाट; अॅपलने २० स्टोअर केले बंद
नाक झाकेल इतपत मास्क घालण्यास नकार देणे, इत्यादींचा नियमांच्या उल्लंघनात समावेश होतो. विमानतळ परिसरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेण्यासाठी प्रशासनाने डिजीटल बोर्ड लावले आहेत. तसेच विमानतळावर नियमितपणे घोषणा केल्या जातात. डीजीसीएच्या निर्देशाप्रमाणे मार्शल हे नियमांचे पालन करण्यास नकार देणाऱ्या व्यक्तींकडून दंड घेणार आहेत. आणखी नियमांचे उल्लंघन केले तर संबंधित यंत्रणेकडे पुढील कारवाई करण्यासाठी त्या व्यक्तीला सोपविले जाणार आहे.
हेही वाचा-हिरो समुहाच्या मानद चेअरमनच्या पत्नी संतोष मुंजाल यांचे निधन
महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक-
राज्यात नव्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ होताना दिसत आहे. आजची आकडेवारी राज्याची चिंता वाढवणारी आहे. आज राज्यात तब्बल ४९ हजार ४४७ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर ३७ हजार ८२१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात २७७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.