नवी दिल्ली - स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडियाने पुण्यातील चाकण येथील उत्पादन प्रकल्पाचे काम महिनाभर स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबरच्या मध्यापासून ते जानेवारीच्या मध्यापर्यंत विविध उत्पादनांचे अद्ययावतीकरण होणार असल्याचे सूत्राने सांगितले.
नुकतेच स्कोडा ऑटो कंपनीने एक महिना उत्पादन प्रकल्पाचे काम स्थगित ठेवले होते. यापूर्वी स्कोडा ऑटो ही फॉक्सवॅगन इंडिया नावाने ओळखली जात होती. कंपनीने इंडिया २.० प्रकल्प हाती घेतला आहे. त्यामध्ये नवीन पिढीसाठी लागणाऱ्या उत्पादनांच्या निर्मितीसाठी तयारी करण्यात येत आहे.
वाहन विक्रीत झाली घसरण-
वाहन उद्योगातील मंदीचा स्कोडा ऑटो कंपनीला फटका बसला आहे. स्कोडा ऑटोला सध्या भारतीय बाजारपेठेत विविध आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. चालू वर्षाच्या एप्रिल-ऑक्टोबरदरम्यान फॉक्सवॅगन इंडियाने १७ हजार ७३३ वाहनांची विक्री झाली. ही विक्री गतवर्षीच्या तुलनेत १७.०१ टक्क्यांनी कमी आहे. तर स्कोडा ऑटोच्या विक्रीतही गतवर्षीच्या तुलनेत १८.२ टक्के घसरण झाली आहे.
कंपनीचे पुण्यात मुख्यालय आहे. तर पुणे आणि औरंगाबादमध्ये उत्पादन प्रकल्प आहेत. मुंबई, नवी दिल्ली आणि देशाच्या इतर भागात प्रादेशिक कार्यालये आहेत.
फॉक्सवॅगन ग्रुपने जूलै २०१८ मध्ये १ अब्ज युरोची गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. कंपनीने पुण्यात जानेवारीमध्ये नवे तंत्रज्ञान केंद्र सुरू केले आहे. यामध्ये स्थानिक ग्राहकांना लागणारे वाहनांचे तंत्रज्ञान विकसित करण्यात येते.
स्कोडा ऑटोने फॉक्सवॅगन इंडियाने मध्यम आकाराच्या एसयूव्ही वाहनांचे मॉडेल बाजारात आणण्याचे नियोजन केले आहे. या उत्पादनांची स्कोडा आणि फॉक्सवॅगनच्या शोरुममधून विक्री करण्यात येणार आहे.