नवी दिल्ली - खनिज तेलाचे उत्पादन कमी होणार असल्याच्या शक्यतेने जागतिक बाजारात खनिज तेलाचे दर अंशत: वाढले आहेत. असे असले तरी देशातील बहुतांश शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाले आहेत. पेट्रोलचे दर प्रति लिटर २२-२३ पैशांनी कमी झाले आहेत. तर डिझेलचे दर प्रति लिटर २०-२१ पैशांनी कमी झाले आहेत.
दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर ७१.४९ रुपये आहे. मुंबईत पेट्रोल प्रति लिटर ७७.१८ रुपये, कोलकात्यामध्ये ७४.१६, चेन्नईत ७४.२८ रुपये प्रति लिटर आहे. डिझेलचा दर प्रति लिटर ६४.१० रुपये आहे. तर मुंबईमध्ये प्रति लिटर ६७.१३ रुपये, कोलकात्यात ६६.४३ रुपये आणि चेन्नईत ६७.६५ रुपये आहे. ही माहिती इंडियन ऑईल कॉर्पोरेशन वेबसाईटने दिली आहे.
खनिज तेलाचे दर सकाळी पावणेदहा वाजता प्रति बॅरल १.८० टक्क्यांनी वाढून ५१.४१ डॉलर झाले आहेत. यापूर्वी बॅरलचा दर हा ४८.५० डॉलर होता. हे दर जूलै २०१७ नंतर सर्वाधिक कमी राहिले आहेत. कोरोना विषाणुमुळे जागतिक बाजारात खनिज तेलाचे दर घसरत आहेत. या पार्श्वभूमीवर सौदी अरेबिया आठवडाभरात सुमारे १० लाख बॅरलचे उत्पादन कमी घेण्याची शक्यता आहे.
हेही वाचा-मुंबई शेअर बाजारात ५०० अंशांनी उसळी; आयसीआयसीआयच्या शेअरमध्ये सर्वाधिक तेजी
देशातील पेट्रोल-डिझेलचे दर हे जागतिक बाजारपेठेतील खनिज तेलाच्या दरावर अवलंबून असतात. तसेच रुपया-डॉलरमधील विनिमय दराचाही पेट्रोल-डिझेलच्या दरावर परिणाम होतो. देशात लागणाऱ्या खनिज तेलापैकी ८० टक्के तेलइंधन भारतात आयात करण्यात येते.
हेही वाचा-विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीत महानगरांमध्ये ५३ रुपयांनी कपात