सिंगापूर - पुण्यात सिंगापूरचा शॅडो ग्रुप ७० कोटींची (१० दशलक्ष डॉलर) गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक पुण्यातील उत्पादन प्रकल्पासाठी वापरण्यात येणार आहे. त्यामधून इलेक्ट्रिक तीन चाकी वाहनांचे उत्पादन घेण्यात येणार आहे.
शॅडो ग्रुपचे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी तथा कार्यकारी अधिकारी सौरभ मार्केंडेय यांनी शॅडोच्या गुंतवणुकीबाबत माहिती दिली. ते म्हणाले, कंपनीचा सिंगापूर, मलॅक्का आणि बंगळुरूमध्ये संशोधन आणि विकास प्रकल्प आहे. पुण्यातील प्रकल्पामधून दर महिन्याला १ हजार वाहनांचे उत्पादन घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
शहरी भागात प्रदूषणमुक्त वातावरणासाठी तीन चाकी विकसित करण्यात आली आहे. ईरिक ही तीनचाकी एकदा चार्जिंग केल्यास ७० किमी धावू शकते. तसेच अतिशय उच्च तापमानामध्येही ती धावू शकते. ईरिक पॅसेंजर आणि कार्गो तीनचाकी वाहन हे देशभरातील शहरी भागात उपलब्ध होणार आहे. तसेच दक्षिण आशियासह आफ्रिकेमध्ये उपलब्ध होणार आहे.
बंगळुरूमधील अडारिन इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीसने वाहनांची संरचना आणि निर्मिती केली आहे. ही कंपनी शॅडो ग्रुपमध्ये २०१७ मध्ये विलीन झाली आहे. वाहनांची चार्जिंग करण्याची व्यवस्था विकसित करण्यासाठी शॅडो ग्रुप सूक्ष्म आणि मध्यम उद्योगाबरोबर भागीदारी करणार आहे. त्यामुळे ग्राहकांकडून इलेक्ट्रिक वाहने अधिकाधिक स्वीकारली जातील, असा विश्वास मार्केंडेय यांनी व्यक्त केला.