नवी दिल्ली - कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (सीएआयटी) ने सांगितले की, या दिवाळीत देशातील प्रमुख बाजारांत व्यापाऱ्यांनी सुमारे 72 हजार कोटी रुपयांची विक्री केली. व्यापारी मंडळाच्या म्हणण्यानुसार, सीएआयटीने चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याच्या आवाहन केल्यानंतर यंदाच्या दिवाळीदरम्यान कोणतीही चिनी वस्तू विकली गेली नाही.
सीएआयटीने एका निवेदनात म्हटले आहे की, देशातील 20 विविध शहरांतून संकलित झालेल्या अहवालानुसार, दिवाळी उत्सवाच्या विक्रीतून सुमारे 72 हजार कोटींची उलाढाल झाल्याची नोंद करण्यात आली. यामध्ये चीनला 40 हजार कोटी रुपयांचा फटका बसला.
हेही वाचा - धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर देशभरातील नागरिकांनी खरेदी केले 20 हजार कोटींचे सोने - आयबीजेए
दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, नागपूर, रायपूर, भुवनेश्वर, रांची, भोपाळ, लखनऊ, कानपूर, नोएडा, जम्मू, अहमदाबाद, सूरत, कोचीन, जयपूर, चंदीगड यासह वीस शहरांना प्रमुख वितरण शहरे मानले जाते.
सीएआयटीने म्हटले आहे की, दिवाळीच्या सणासुदीच्या काळात व्यावसायिक बाजारपेठेत जोरदार खरेदी-विक्री झाल्यामुळे भविष्यात चांगल्या व्यवसायाची शक्यता दिसून येत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू उमटू शकते.
एफएमसीजी वस्तू, ग्राहक टिकाऊ वस्तू, खेळणी, विद्युत उपकरणे व इतर उपकरणे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, स्वयंपाकघरातील वस्तू, भेट वस्तू, मिठाई वस्तू, मिठाई, गृहसजावट, टेपेस्ट्री, भांडी, सोने व दागिने, शूज, घड्याळे, फर्निचर या वस्तूंची दिवाळीत सर्वांत जास्त खरेदी करण्यात आली. कपडे, फॅशन परिधान, घर सजावटीच्या वस्तूही खरेदी केल्या गेल्या.
हेही वाचा - किरकोळ बाजारपेठेत महागाईचा डोंब; ऑक्टोबरमध्ये साडेसहा वर्षातील उच्चांक