पुणे- कोरोनाच्या लढ्यात महत्त्वाची ठरू शकणाऱ्या सिरमच्या लसीचे उत्पादन थांबणार आहे. सिरम इन्स्टिट्यूटने ऑक्सफोर्डच्या भागीदारीतून उत्पादित करण्यात येणाऱ्या लसीचे उत्पादन थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एक आशेचा किरण म्हणून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या कोविशील्ड या लसीकडे पाहिले जात होते. परंतु मानवी चाचणीमध्ये सहभागी झालेली एक व्यक्ती आजारी पडल्यामुळे अँस्ट्राझेन्का आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने मानवी चाचणी थांबवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सिरम इन्स्टिट्यूटने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे भारतातील चाचणी सुरू राहिल असे सांगितले होते. परंतु ट्विटरद्वारेच सिरम इन्स्टिट्यूटने भारतातील लशीच्या चाचण्या थांबवल्याचे जाहीर केले आहे.
भारतीय औषधी नियंत्रण महासंचालनालयाच्या सूचनेची प्रतिक्षा करत असल्याचे सिरमने म्हटले आहे.
त्यापेक्षा अधिक प्रतिक्रिया देणे शक्य नसल्याचे कंपनीने म्हटले आहे.
- पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (एसआयआय) कोरोनाच्या लसींचे 10 कोटी डोस तयार करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते.
- हे डोस भारत आणि मध्य उत्पन्न असलेल्या देशांसाठी 2021 पर्यंत तयार करण्यात येणार आहे. या लसीची किंमत जास्तीत जास्त 3 डॉलर (सुमारे 225 रुपये) असणार आहे.
- सिरम ही विविध लसींचे उत्पादन करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. या कंपनीने कोरोनाची लस तयार करणाऱ्या ऑक्सफोर्ड विद्यापीठाबरोबर उत्पादनासाठी भागीदारी केली आहे.
- केंद्र सरकारने सिरमला दुसऱ्या व टप्प्यातील कोरोनाच्या लसीची मानवी चाचणी घेण्यासाठी परवानगी दिली आहे. ऑक्सफोर्डच्या कोरोनावरील लसीमुळे प्रतिकारक्षमता वाढत असल्याचे दिसून आले आहे.
- ऑक्सफर्ड विद्यापीठाने 20 जुलै 2020 रोजी कोविडशिल्ड या कोरोना लसीचे सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचे जाहीर केले आहे.
- जगभरात विकसित करण्यात येत असलेल्या लसींमध्ये ही लस आघाडीवर आहे.
- प्रसिद्ध लॅन्सेट सायन्स संस्थेनेही लसीच्या सकारात्मक परिणामांना दुजोरा दिला आहे. व्यक्तीमध्ये प्रतिकारक्षमता तयार होत असून ती सुरक्षित असल्याचे लॅन्सेटने म्हटले आहे. संपूर्ण जगाच्या या लसीकडे आशा लागल्या आहेत.