रियाध – काश्मीरचा प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा प्रयत्न करणे पाकिस्तानला चांगलेच महागात पडले आहे. काश्मीरबाबत इशारा दिल्याने सौदी अरेबियाने पाकिस्तानकडून 1 अब्ज डॉलरचे कर्ज वसूल केले आहेत. त्यानंतर खनिज तेलाचा पुरवठाही थांबला आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि सौदी अरेबियामधील मैत्रीचे संबंध संपुष्टात आले आहेत.
सौदी अरेबियाने पाकिस्तानला 6.2 अब्ज डॉलरचे अर्थसहाय्य देण्याचे नोव्हेंबर 2018 मध्ये जाहीर केले होते. त्यामध्ये 3 अब्ज डॉलरचे कर्ज आणि 3.2 अब्ज डॉलर हे खनिज तेलाचा पुरवठ्यासाठी देण्यात आले होते.
सौदी अरेबियाने इस्लामिक संघटना असलेल्या आयओसीमध्ये काश्मीरच्या मुद्द्यावरून भारताविरोधात प्रश्न उपस्थित करावा, अशी पाकिस्तानकडून वारंवार मागणी करण्यात येत आहे. याबाबत नुकतेच पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशा यांनी सौदी अरेबियाला इशारा दिला होता. त्यानंतर सौदी अरेबियाकडून 1 अब्ज डॉलरचे कर्ज वसूल केले. तसेच खनिज तेलाचा पुरवठाही थांबविला आहे.
इस्लाम धर्माबाबत अकारण वाटणारी भीती (इस्लामफोबिया) भारतात वाढत असल्याचा प्रचार करणारी आंतरराष्ट्रीय मोहीम पाकिस्तानने सुरू केली होती.
मालदीवचे संयुक्त राष्ट्रसंघातील कायमस्वरुपी सदस्य थिलेमेझ्जा हुस्सेन म्हणाल्या, की इस्लामफोबियाच्या दृष्टीने भारतातबाबत केलेले दावे हे चुकीचे आहेत. भारतात अनेक शतके इस्लाम अस्तित्वात आहे. दक्षिण आशियात मुस्लिमांच्या संख्येत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. याकडे हुस्सेन यांनी लक्ष वेधले.
दरम्यान, जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर संयुक्त राष्ट्र संघातही काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्याचा पाकिस्तानने प्रयत्न केला होता. मात्र, भारताने काश्मीरचा मुद्दा दोन देशांमधील मुद्दा असल्याचे सांगत पाकिस्तानचे सर्व मुद्दे खोडून काढले होते.