हैदराबाद - डिजीटल आर्थिक व्यवहारांना चालना देण्यासाठी आरबीआयने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आरटीजीएसचे व्यवहार ग्राहकांना डिसेंबरमध्ये २४X७ म्हणजे सातही दिवस २४ तासात कधीही करता येणार आहेत.
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण जाहीर करताना आरटीजीएसच्या सेवेबाबत घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. ते म्हणाले, की काही मोजक्याच देशामध्ये आरटीजीएस ही आर्थिक व्यवहाराची सुविधा २४x७x३६५ उपलब्ध आहे. त्यामध्ये भारताचा समावेश असणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मूल्याधारित देयक व्यवस्था आणि उद्योगानूकलतेला चालना मिळू शकणार आहे.
सध्या, आरटीजीएस सेवा ही केवळ कार्यालयीन दिवसांमध्ये सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत उपलब्ध आहे. तर काही बँकांच्या आरटीजीएसच्या वेळेत बदल आहे. आरबीआयने एनईएफटीची व्यवस्था डिसेंबर २०१९ मध्ये २४x७x३६५ उपलब्ध केली आहे. आरटीजीएस आणि एनईएफटीमधून आर्थिक व्यवहार करता येतात. एनईएफटीमधून पैसे पाठविण्याची मर्यादा नाही. यामधून १ रुपयाही पाठविणे शक्य आहे. तर आरटीजीएसमधून किमान २ लाख पाठवावे लागतात. आरटीजीएसमधून जास्तीत जास्त किती पैसे पाठवावे, याची मर्यादा संबंधित बँकेकडून निश्चित करण्यात येते. आरटीजीएसमधून त्वरित पैसे पाठविले जातात. तर एनईएफटीमध्ये काही तासांच्या अवधीत पैसे ग्राहकांच्या बँक खात्यावर पाठविले जातात.