चेन्नई - चेन्नईमध्ये अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाल्याने अनेक हॉटेल व्यावसायिकांसह कंपन्यांना काम सुरळित ठेवणे कठीण जात आहे. याच संकटाचा सामना करणाऱ्या रॉयल एनफील्डच्या सर्व्हिस सेंटरने वाहने धुण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.
वाहनांच्या स्वच्छतेसाठी वापरण्यात येणाऱ्या व्यवस्थेमुळे (ड्राय वॉश) सुमारे १८ लाख लिटर पाण्याची दर महिन्याला बचत होणार आहे. रॉयल एनफील्डचे मुख्य व्यवसाय प्रमुख शाजी कोषी म्हणाले, ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी आम्ही दीर्घकाळ बांधील आहोत. त्याचा भाग म्हणून आम्ही या उपक्रमाची सुरुवात केली आहे.
चेन्नईतील परिस्थितीमुळे आम्हाला नवसंशोधनाचा वापर करावा लागला आहे. आमच्या कार्यपद्धतीत कार्यक्षमता आणावी लागली आहे. हे आमचे कायमस्वरुपी ध्येय आहे. या पथदर्शी उपक्रमाची चेन्नईपासून सुरुवात करण्यात येत आहे. त्यानंतर हा उपक्रम तामिळनाडूतील शहरात करण्यात येणार आहे.
काय आहे ड्राय वॉश-
ड्राय वॉश हे चांगले तंत्रज्ञान आहे. त्यामुळे वाहनाच्या स्वच्छतेत तडजोड न करता पाण्याची कमी गरज लागते. तसेच वाहनांची स्वच्छता करण्यासाठी कमी वेळ लागतो. रॉयल एनफील्डचे देशातील ६०० हून अधिक शहरांत ९०० वर्कशॉप आहेत.