नवी दिल्ली – के. व्ही. कामत यांची कर्जाबाबतच्या समितीच्या अध्यक्षपदावरील नियुक्तीबाबत फेरविचार करावा, अशी विनंती बँक कर्मचाऱ्यांची संघटना एआयबीईएने आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांना केली आहे. आयसीआयसीआय बँकेचे माजी चेअरमन असलेले कामत यांचे चंदा कोचर यांच्याविरोधातील आरोपपत्रात नाव आले होते, असा एआयबीईने दावा केला आहे.
अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेने (एआयबीईए) आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात संघटनेने म्हटले आहे, की चंदा कोचर यांनी व्हिडिओकॉन ग्रुपला 1 हजार 875 कोटी रुपयांची सहा कर्ज प्रकरणे मंजूर केली होती. त्यापैकी काही कर्ज प्रकरणे हे कामत हे आयसीआयसीआय बँकेचे अकार्यकारी चेअरमन असताना मंजूर झाले होते. तसेच ते कर्ज मंजूर करण्याच्या समितीचे सदस्यही होते. त्यामुळे तपास सुरू असताना त्यांच्याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे या टप्प्यावर आम्हाला वाटते, की चेअरमन म्हणून असा व्यक्ती तज्ज्ञ समितीवर असणे टाळणे आवश्यक आहे. नियुक्तीबाबत पुनर्विचार करणे गरजेचे आहे, असे संघटनेने पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, कोरोना महामारीमुळे अनेक उद्योगांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे कर्जदारांना दिलासा देण्यासाठी एकवेळ कर्जाची पुनर्ररचना योजना तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी शिफारशी करण्यासाठी आरबीआयने पाच सदस्यीय तज्ज्ञांची समिती स्थापना केली आहे. या समितीचे के. व्ही. कामत हे अध्यक्ष आहेत.