नवी दिल्ली - देशातील सर्वात श्रीमंत असलेल्या मुकेश अंबांनींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने सरकारी कंपनी इंडियन ऑईलला आर्थिक उलाढाली व नफ्यात (आयओसी) मागे टाकले आहे. त्यामुळे रिलायन्स ही देशातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. असे असले तरी रिलायन्सवर २.८७ लाख कोटींचे कर्ज आहे.
रिलायन्सची आर्थिक वर्ष २०१८-२०१९ मध्ये ६.३३ लाख कोटींची आर्थिक उलाढाल झाली आहे. तर याच कालावधीत इंडियन ऑईल कंपनीची उलाढाल ही ६.१७ लाख कोटी रुपये झाली आहे. ही माहिती शेअर बाजाराला दिलेल्या माहितीतून समोर आली आहे.
रिलायन्सने नफ्यातही इंडियन ऑईलला टाकले मागे-
रिलायन्सने इंडियन ऑईल कंपनीला नफा कमविण्यातही मागे टाकले आहे. रिलायन्सने इंडियन ऑईलहून अधिक दुप्पट नफा मिळविला आहे. रिलायन्सने दशकभरापूर्वीच दूरसंचार, रिटेल आणि डिजीटल सेवांमध्ये विस्तार केला आहे. २०१९ च्या आर्थिक वर्षात कंपनीने ३९ हजार ५८८ कोटींचा निव्वळ नफा मिळविला आहे. तर इंडियन ऑईल कंपनीने निव्वळ १७, 274 कोटींचा नफा मिळविला आहे. गेली दहा वर्षे इंडियन ऑईल ही सर्वात अधिक नफा कमविणारी कंपनी होती. मात्र ऑईल आणि नॅचरल गॅस कॉर्पोरेशनने (ओएनजीसी) इंडियन ऑईलला नफ्यात मागे टाकले आहे. ओएनजीसीने आर्थिक वर्ष २०१८-१९ मधील पहिल्या नऊ महिन्यात २२ हजार ६७१ कोटींचा नफा मिळविला आहे.
यामुळे इंडियन ऑईलच्या नफ्यात घट-
इंडियन ऑईल कंपनीचा फायदा हा रिफायनिंग, पेट्रोकेमिकल्स आणि गॅसच्या व्यवसायावर अवलंबून आहे. या व्यवसायात २०१८-१९ मध्ये २३.६ टक्क्यांची घट झाली आहे. तर दुसरीकडे रिलायन्सच्या नफ्यात आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये १३ टक्क्यांची वाढ झाली. यामुळे यावर्षी रिलायन्सला ३४ हजार ९८८ कोटींचा नफा झाला आहे.
कर्जाचे प्रमाण रिलायन्सवर अधिक-
महसूल, शेअरचे मूल्य, नफा यामुळे रिलायन्सला सर्वात मोठी कंपनीचा मान मिळविणे शक्य झाले आहे. रिलायन्सच्या आर्थिक ताळेबंदात १.३३ लाख कोटी रुपये शिल्लक आहेत. मात्र प्रत्यक्षात कंपनीवर मार्च २०१९ पर्यंत २.८७ लाख कोटींचे कर्ज आहे. तर इंडियन ऑईल कंपनीवर सुमारे ९२ हजार ७०० कोटींचे कर्ज आहे.