नवी दिल्ली - रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांनी गुजरातमधील जामनगर तेलशुद्धीकरण प्रकल्पामधून रोज 700 टन ऑक्सिजनची निर्मिती सुरू केली आहे. त्यामुळे रोज 70 हजारांहून अधिक अत्यवस्थ असलेल्या कोरोनाबाधितांना दिलासा मिळत आहे.
गुजरातमधील जामनगर प्रकल्पामध्ये सुरुवातीला दररोज १०० टन वैद्यकीय ऑक्सिजनची निर्मिती सुरू झाली होती. मात्र, देशातील ऑक्सिजनची मागणी आणि कोरोनाबाधितांचे वाढते प्रमाण पाहता ऑक्सिजन निर्मितीचे प्रमाण हे 700 टन करण्यात आल्याचे सूत्राने सांगितले. हा ऑक्सिजनचा पुरवठा गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात करण्यात येत आहे. रोज 1 हजार टन वैद्यकीय ऑक्सिजनची निर्मिती करण्याचा प्रयत्न असल्याचे कंपनीमधील सूत्राने सांगितले.
हेही वाचा-महापालिकेनं 'या' रुग्णालयांना पुरवले इतके ऑक्सिजन सिलेंडर
प्रत्यक्षात जामनगरमधील तेलशुद्धीकरण प्रकल्पात कच्च्या तेलापासून पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधनाचे उत्पादन केले जाते. मात्र, देशात कोरोनाबाधितांना लागणाऱ्या ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन ऑक्सिजनची निर्मिती घेण्यात येत आहे. त्यासाठी रिलायन्सने प्रकल्पामध्ये मशिनरी आणि इतर यंत्रणा बसविली आहे. सुत्राच्या माहितीनुसार औद्योगिक उत्पादनासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनचे वैद्यकीय ऑक्सिजनमध्ये रुपांतरण करण्यात येत आहे. जामनगरमधील तेलशुद्धीकरण प्रकल्प हा जगातील सर्व तेलशुद्धीकरण प्रकल्प आहे.
हेही वाचा-ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना, पाच दिवसांत रेल्वेने येणार ११० मे. टन द्रवरूप प्राणवायू
मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत
मुकेश अंबानी यांच्या गुजरातच्या जामनगरमध्ये रिलायन्सच्या प्लांटमधून महाराष्ट्रसाठी ऑक्सिजन मिळावा म्हणून मुख्यमंत्र्यांनी रिलायन्स ग्रुपशी चर्चा केल्याची माहिती नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. रिलायन्स ग्रुपकडून जवळपास 100 मेट्रिक टन ऑक्सिजन मदत म्हणून दिली जात आहे. यासाठी रिलायन्स ग्रुपकडून कोणतीही रक्कम आकारली जाणार नसल्याचे रिलायन्स ग्रुपच्या जनसंपर्क कर्यालयाकडून सांगण्यात आले. सध्या महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे लोकांचा रुग्णालयात ऑक्सिजन अभावी मृत्य होत आहे. त्यामुळे, मानवतेच्या दृष्टिकोनातून ही मदत रिलायन्सकडून राज्यसरकरला करण्यात येणार आहे.