मुंबई - साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त अनेकजण नवे घर विकत घेतात. तसेच बांधकाम विकासक नव्या गृहप्रकल्पाची सुरुवात करतात. मात्र, यंदा कोरोनाची भीती असल्याने बांधकाम उद्योगांमध्ये निरुत्साह आहे.
गुढीपाडव्यापूर्वी बांधकाम क्षेत्रात आनंदाचे, उत्साहाचे आणि गडबडीचे वातावरण सुरू असते. गुढी पाडव्यादरम्यान बांधकाम क्षेत्राला मोठी चालना मिळते. यंदा मात्र गुढीपाडवा बांधकाम क्षेत्रासाठी नेहमीप्रमाणे उत्साहवर्धक नाही.
मुंबईसह देशभर कोरोनाचा कहर असून याचा फटका आता बांधकाम क्षेत्रालाही बसू लागला आहे. ग्राहकांनी घरखरेदीकडे पाठच फिरवल्याने मंदीत असलेल्या बांधकाम व्यवसायाला गुढीपाडव्यातही मंदीतून सावरण्याची संधी मिळणार नाही.
गेल्या काही वर्षांपासून बांधकाम व्यवसाय मंदीची झळ सोसत आहे. घरांसाठी ग्राहकांची मागणी आहे, मात्र परवडणाऱ्या दरातील घरे उपलब्ध होत नसल्याने घरखरेदी-विक्रीही गेल्या काही वर्षांपासून मंदावलेलीच आहे. नोटबंदी, जीएसटीने बांधकाम क्षेत्राचे कंबरडे मोडले आहे. बांधकाम व्यवसायातील मंदी आणखी वाढली आहे. असे असले तरी बांधकाम व्यवसायाला मंदीतून थोडेफार सावरण्यासाठी साडेतीन मुहुर्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया, दसरा आणि दिवाळीचा पाडवा अशा काळात मोठा वाव मिळतो.
घरासारखी महत्त्वाची खरेदी, घराचा ताबा घेणे, गृहप्रवेश असे व्यवहार गुढीपाडव्यासारख्या शुभ मुहुर्तावर करण्याची अनेकांची मानसिकता असते. त्यामुळेच दरवर्षी गुढीपाडव्याच्या आठवडाभराच्या काळात घरखरेदी-विक्री, गृहनोंदणीसह अन्य व्यवहार तेजीत येतात. तर याच शुभ मुहुर्तावर नवीन प्रकल्पाचा शुभारंभ बांधकाम व्यवसायिक करतात.
हेही वाचा-फोन कॉलिंगचे किमान दर निश्चित करण्याला आयएएमएआय संघटनेचा विरोध
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी घराबाहेर पडणेच बंद केले आहे. पुढचे काही दिवस परिस्थिती अशीच राहणार आहे. ग्राहक अत्यंत महत्त्वाची कामेही टाळत असताना घर खरेदीसाठी बाहेर पडणे शक्यच नाही. त्यामुळे गेल्या आठवड्याभरात घरांसाठीची चौकशी, गृहनोंदणी, घराचा ताबा घेणे असे व्यवहार पूर्णपणे ठप्प असल्याची माहिती बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे प्रवक्ता आनंद गुप्ता यांनी दिली आहे. तर बांधकाम विकसकांनी कोरोनाची भीती लक्षात घेत गुढीपाडव्याच्या दिवशी एकाही प्रकल्पाचा शुभारंभ न करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्यांदाच एखाद्या साथीच्या आजारामुळे अशीच परिस्थिती असणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा-COVID-19 LIVE : देशातील रुग्णांची संख्या 151 वर, महाराष्ट्र आणि केरळमध्ये सर्वात जास्त बाधित
दरम्यान गुढीपाडव्याच्या निमित्ताने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विकसकांकडून सवलतींच्या घोषणा केल्या जातात. पण यंदा ग्राहकच घराबाहेर पडत नसल्याने सवलती देऊनही फायदा नाही. त्यामुळे विकसकांकडून सवलती दिल्या जात नसल्याचे चित्र आहे. कोरोनाचे सावट लवकरच दूर होत बांधकाम व्यवसायासह सर्वच व्यवसायांना उभारी मिळेल, अशी अपेक्षा बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.